ट्रम्प यांचे भारत धोरण अत्यंत चुकीचे
ऑस्ट्रेलियाचे माजी नेते टोनी अॅबॉट यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था / कॅनबेरा
ऑस्ट्रेलियाचे माजी प्रमुख नेते टोनी अॅबॉट यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतासंबंधीच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे. ट्रम्प यांनी भारतावर प्रचंड व्यापार शुल्क लागू केले आहे. ही त्यांची कृती समर्थनीय नसून अन्यायपूर्ण आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे अमेरिका आता पाकिस्तानच्या बाजूला झुकली असून हे धोरणही चुकीचेच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मी स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांचा समर्थक आहे. तथापि, त्यांच्या भारतासंबंधीच्या धोरणाशी मी सहमत नाही. भारतावर मोठे व्यापारी शुल्क लावून त्यांनी चुकीची खेळी केलेली आहे. अमेरिका हे एक लोकशाही राष्ट्र असून तिने भारत या लोकशाही राष्ट्राशी संबंध भक्कम ठेवले पाहिजेत. जागतिक समतोलाच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. अमेरिकेने पाकिस्तानसारख्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या देशाशी संबंध ठेवणे अयोग्य आहे, असे स्पष्ट मतप्रदर्शन त्यांनी एका मुलाखतीत केले आहे.
हा भारताला धक्का
अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लावले आहे. हा भारताला धक्का आहे. अमेरिका असे करेल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र हा धक्का अल्प कालावधीकरीता असेल आणि लवकरच दोन्ही देश एकमेकांशी जुळवून घेतील, अशी आशा मला वाटते. भारताचे इतर लोकशाहीवादी देशांशी घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे भारत या करधक्क्यातून लवकरच बाहेर येईल. अमेरिकेनेही भारताचा विचार सहानुभूतीपूर्वक आणि केवळ पैशाच्या पलिकडे जाऊन करण्याची आवश्यकता आहे, अशा अर्थाचे मतप्रदर्शन अॅबॉट यांनी केले आहे.
ऑगस्टपासून कर लागू
अमेरिकेने भारतावर प्रथम 25 टक्के कर लागू केला होता. त्यानंतर ऑगस्टपासून हा कर 50 टक्के करण्यात आला आहे. भारत रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची खरेदी करीत असल्याने हा अतिरिक्त 25 टक्के कर लावण्यात आला आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट पेले आहे. मात्र, अमेरिकेची ही भूमिका पक्षपाती आहे, अशी टीका होत आहे. कारण चीन भारतापेक्षाही अधिक तेल रशियाकडून घेतो. पण अमेरिकेने चीनवर केवळ 30 टक्के कर लावला आहे. काही दिवसांपूर्वी दुर्मिळ धातूंच्या पुरवठ्यासंदर्भात अमेरिका आणि चीन यांच्यात नव्याने वाद निर्माण झाल्याने अमेरिकेने चीनवर 130 टक्के कर लागू केला आहे. तथापि, हा कर फार काळ टिकणार नाही, अशीही परिस्थिती आहे. भारतासंबंधीची अमेरिकेची भूमिका मात्र अनाकलनीय आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
अर्थव्यवस्था समाधानकारक
अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लागू करुन आता जवळपास दोन महिने झाले आहेत. तथापि, भारताने ही स्थिती समाधानकारकरित्या हाताळल्याचे दिसून येत आहे. भारताच्या चलन व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी रिझर्व्ह बँक आणि भारताचे आर्थिक धोरणकर्ते यांच्या संबंध चांगले आहेत. त्यामुळे दोन्ही संस्था एकमेकांना सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम सहकार्य करीत आहेत. भारताची वित्तीय स्थिती चांगली आहे. चलनफुगवटा आणि महागाईचा दर नियंत्रणात आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली.