ट्रंप यांचे भवितव्य न्यायालयाच्या हाती
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे राजकीय भवितव्य अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाकडून निर्धारित केले जाणार आहे. अमेरिकेत या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणूक होत असून त्या निवडणुकीत ट्रंप हे उमेदवार म्हणून भाग घेऊ शकतील काय, यावर तेथील सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल.
ट्रंप यांचा 2020 च्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याकडून पराभव झाला होता. पराभवानंतर अमेरिकेच्या कॅपिटॉल हिल परिसरात दंगल उसळली होती. ही दंगल ट्रंप यांनीच भडकाविली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ट्रंप यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहारांच्या संदर्भातही अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. काही न्यायालयांमध्ये ट्रंप यांच्यावर अभियोग सुरु आहेत. तर अमेरिकेच्या दोन प्रांतांनी ट्रंप यांच्या उमेदवारीवर त्यांच्या प्रांतांमध्ये बंदी घातलेली आहे.
या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण तेथील सर्वोच्च न्यायालयात (फेडरल कोर्ट) पोहचले आहे. पुढची अध्यक्षीय निवडणूक होण्याच्या बराच काळ आधी या प्रकरणाचा अंतिम निर्णय येणे आवश्यक आहे. आतापासूनच अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वहात असून तेथील रिपब्लिकन पक्ष आणि डेमॉक्रेटिक पक्ष या दोन्ही प्रमुख पक्षांनी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभही केला आहे. अमेरिकेत अध्यक्षीय उमेदवारांची निवड त्या त्या पक्षाच्या नोंदणीकृत मतदारांकडून केली जाते. या निवडणुकांचे प्राथमिक टप्पे आता सुरु झाले आहेत.
लवकर निर्णय येणार
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या घडामोडी लक्षात घेऊन या प्रकरणाची सुनावणी लवकर केली जाईल, असा संकेत दिला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये ट्रंप यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाकडून निर्धारित केले जाऊ शकते, अशी स्थिती आहे. न्यायालयाने दिलासा दिल्यास डोनाल्ड ट्रंप हेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास मात्र या पक्षाला नवा उमेदवार जनतेसमोर आणावा लागणार आहे.