ट्रम्पची डॉनगिरी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत लहरी, विक्षिप्त, अविश्वासार्ह व तितकेच माथेफिरू राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून ट्रम्प यांच्या या गुणावगुणांचे वारंवार जगाला दर्शन घडत असल्याचे दिसून येते. भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 25 टक्के वाढीव आयातशुल्क लादण्याचा आणि रशियाशी व्यापार केल्याबद्दल भारताला दंड सुनावण्याची त्यांची घोषणा हा त्याचाच परिपाक मानावा लागेल. भारत आणि रशिया यांच्यात जुना दोस्ताना आहे. मागच्या सात, साडेसात दशकात अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु, या मैत्रीत कधीही अंतर पडलेले नाही. दुसऱ्या बाजूला भारताने महासत्ता अमेरिकेशीही मैत्र जुळवत दोन देशांतील संबंध अधिकाधिक दृढ करण्यावर नेहमीच भर दिला आहे. पंडित नेहरूंच्या काळापासून चालत आलेल्या भारताच्या तटस्थ धोरणाचाच हा भाग होय. परंतु, देशाचा हा पूर्वापार चालत आलेला दृष्टीकोन समजून घेण्याइतकी प्रगल्भता न दाखवणे, हे ट्रम्प यांच्या लौकिकास साजेसेच म्हटले पाहिजे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष मागच्या दोन वर्षांपासून सुरू आहे. याला भारताने आपला नैतिक विरोधच दर्शविला आहे. मात्र, या पलीकडे जाऊन भारत अथवा चीनने रशियाकडून तेलखरेदी करू नये, ही ट्रम्प महाशयांची अपेक्षा आहे. ती अवास्तव व अव्यवहार्यच ठरते. परस्परावलंबीत्व हा जगाचा नियम असून, देवाणघेवाण व परस्पर सहचर्यावरच अनेक देशांचा कारभार चालतो. त्याकरिता अनेकदा विसंगती किंवा मतभेद बाजूला ठेवावे लागतात. भारतच नव्हे, तर अनेक देश हेच प्रॅक्टिकल धोरण घेऊन पुढे जातात. त्यामुळे ट्रम्प यांना वाटते म्हणून रशियाकडून लष्करी सामग्री किंवा तेलखरेदी करायची नाही, असे होऊ शकत नाही. तसे पाहिले, तर अमेरिकेनेही आजवर अनेक देशांवर युद्धे लादली आहेत. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून तर अमेरिकेच्या धोरणामध्ये अधिकच गोंधळ पहायला मिळतो. युद्ध, संघर्ष आणि मध्येच विराम अशा त्रिविध भूमिका ट्रम्प एकाच वेळी निभावताना दिसतात. पण, म्हणून अमेरिकेशी आपण व्यापार थांबवलेला नाही. ‘अमेरिकन फर्स्ट’ हे ब्रीदवाक्य घेऊन ट्रम्प सत्तेवर आले. तथापि, अमेरिकेशिवाय जग, हाच त्यांचा प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांच्या वर्तनावरून दिसते. म्हणूनच भारत आणि रशियातील कराराने त्यांची पोटदुखी वाढते. अमेरिकेत भारतीय लोक मोठ्या प्रमाणात स्थायिक आहेत. या देशातील अनेक नगरे, गावे तर निव्वळ भारतीयांनीच गजबजलेली दिसतात. सिलिकॉन व्हॅलीतही भारतीयांचे वर्चस्व पहायला मिळते. स्वाभाविकच भारतीयांबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात एक आकस आहे. हा आकस, मत्सर त्यांच्या व्हिसा वा तत्सम धोरण, नियमांमधून वारंवार अधोरेखित होत आहे. अमरेकित स्थायिक झालेल्या भारतीयांवर कडक निर्बंध लादणे, त्यातून त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणे व भारतीयांचे स्थलांतर रोखणे, ही अमेरिकेच्या या लहरी राजाची त्रिसूत्रीच म्हणता येईल. त्यासाठीच या ना त्या माध्यमातून ते भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच भारत व ब्रिटनमध्ये ऐतिहासिक व्यापारी करार झाला. त्याचाही महासत्तेच्या या नेतृत्वाला पोटशूळ उठला असावा, असे म्हणायला वाव आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धसंघर्षातील ट्रम्प यांची भूमिकाही संशयास्पद होय. पाकच्या छुप्या हल्ल्याने भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर ट्रम्प यांनी युद्धस्थगितीसाठी दिलेल्या धमक्या आणि नंतर सतत आपणच हे युद्ध थांबविल्याचा केलेला दावा यातून ट्रम्प कुठल्या दिशेने चालले आहेत, यावर प्रकाश पडतो. आता तर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात तेल व्यापार करार घडवून त्यांनी एकप्रकारे भारताला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल, हे त्यांचे विधान म्हणजे भारताला खिजवण्याचाच प्रकार म्हणता येईल. पाकिस्तान आपल्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात मोठे तेलसाठे असल्याचा दावा करतो. पण या तेलाच्या उत्खननात त्यांना फार प्रगती साधता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर या दोन देशात झालेला करार आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. तसे अमेरिका पाककडे सरळसरळ झुकत असल्याचेच हे निदर्शक. तथापि, देशातील मनुष्यबळाची ताकद, जगाच्या बाजारपेठेतील आपले स्थान बघता ऊठसूठ भारतविरोधी भूमिका घेणे अमेरिकेलाही महागात पडू शकते. अर्थात ट्रम्प यांच्या टॅरिफचा एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार, हे निश्चित असेल. हा टॅरिफ अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने देशाच्या जीडीपी वाढीला फटका बसू शकतो, असे तज्ञ म्हणतात. शिवाय देशाच्या निर्यातीवरही त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची चिन्हे आहेत. अर्थात हा टॅरिफ बॉम्ब अमेरिकेवर उलटण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. अमेरिका औषधांसाठी मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे. जगाला स्वस्त व चांगल्या दर्जाची औषधे भारत पुरवतो. टॅरिफमुळे औषधे महागली, तर त्याची झळ अमेरिकन नागरिकांना बसू शकेल. स्वाभाविकच ट्रम्प यांना भारताविरोधात वापरलेले हत्यार हे दुधारी आहे. त्यामुळे दीर्घकालीन हेच धोरण कायम ठेवणे, त्यांच्याकरिताही अवघड असेल. भारतातील करदरावर ट्रम्प यांचे आक्षेप आहेत. हा गुंता एकत्र बसून सोडविता येऊ शकतो. त्याकरिता दोन देश पुढच्या टप्प्यात सकारात्मक भूमिका घेतील का, हेही पहावे लागेल. मीच जगाचा बादशहा, मीच तारणकर्ता, अशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांचा कारभार सुरू आहे. तथापि, अशा एककल्ली पद्धतीने महासत्ता डॉनगिरी करण्यात धन्यता मानू लागली, तर त्यातून संपूर्ण जगाचे अर्थकारण बिघडण्याचा धोका संभवतो. ट्रम्प रशियाबरोबरच भारताचा उल्लेखही मृत अर्थव्यवस्था असा करतात. त्यांचा हा विचार किती संकुचित आणि खोटा आहे, हे आगामी काळात भारताला दाखवून द्यावे लागेल.