ट्रम्पशाही धोक्यात...
‘लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी केलेले राज्य म्हणजे लोकशाही,’ ही अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या जगप्रसिद्ध आहे. लोक आणि लोकहितच लोकशाहीचा गाभा आहे, हाच अर्थ या व्याख्येतून ध्वनित होतो. किंबहुना, ज्या लिंकन यांच्या देशाने लोकशाही व्यवस्थेचा मानदंड निर्माण केला, त्या अमेरिकेतील नागरिकांवरच आज ट्रम्पऊपी हुकूमशाहीविऊद्ध रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. जगातील बडे उद्योगपती ही डोनाल्ड ट्रम्प यांची मूळ ओळख. तथापि, ‘अमेरिकन फर्स्ट’ अशी आकर्षक घोषणा देत हे महाशय थेट अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. आपल्या या पहिल्या टर्ममध्येही ट्रम्प यांनी बरेच उद्योग केले. त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांना येथील जनतेकडून संधी मिळाली नाही. मात्र, दरम्यानच्या काळात ट्रम्प यांनी मोठी तयारी केली. अतिराष्ट्रवाद, स्थलांतरितांचा मुद्दा पेटवून ट्रम्प यांनी महासत्तेची गादी पुन्हा प्राप्त केली. खरे तर पहिल्या टर्ममध्ये तुलनेत ट्रम्प यांचे उपद्रवमूल्य कमी होते. परंतु, दुसऱ्या सत्ताकाळात या नेत्याने अमेरिकेसह सगळ्या जगाचा पोत बिघडवल्याचे दिसून येते. वास्तविक, अमेरिका हा उदारमतवादी देश. स्थलांतरितांमधूनच हा देश प्रामुख्याने आकारबद्ध झाला, विकसित झाला. अमेरिकेच्या लोकशाहीने अनेकांना आपल्या उदरात सामावून घेतले. म्हणूनच महासत्ता म्हणून हा देश जगाच्या नकाशावर ठळकपणे आला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. हे राष्ट्र महाशक्ती म्हणून उदयास आले खरे. पण येथील जनजीवनात मागच्या काही वर्षांत काही प्रश्न व समस्याही निर्माण झाल्या. तथापि, त्याचे मूळ हे तेथील सामाजिक वा कुटुंबव्यवस्थेत आहे, हेदेखील समजून घेतले पाहिजे. परंतु ते समजून न घेता ट्रम्प यांच्यासारख्या आत्मकेंद्री नेत्याने रोगापेक्षा उपाय भयंकर अशा पद्धतीने निर्णय घेतले. भारतीयांना दाबण्यासाठी व्हिसाचे नियम कडक करण्यात आले. भारतासह वेगवेगळ्या देशांवर दुप्पट, चारपट टॅरिफ लावण्यात आले. दुसऱ्या बाजूला राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करणे, त्यांची मुस्कटदाबी करणे, स्थलांतर करणाऱ्यांवर छापेमारी करणे यांसारख्या मार्गांचाही अवलंब ट्रम्प महोदयांनी केला. या सगळ्याचा हळूहळू अमेरिकेच्या आर्थिक विकासावर परिणाम होणे क्रमप्राप्तच होते. त्यानुसार मागच्या काही दिवसांत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात महागाई वाढू लागल्याचे दिसले. ट्रम्प यांच्या विविध निर्णयांमुळे अर्थचक्राला चांगलाच ब्रेक लागला. शटडाऊन लागले. अनेक सरकारी सेवा ठप्प झाल्या. स्वाभाविकच या ट्रम्पशाहीविरोधात अमेरिकन पेटून उठले व ‘नो किंग्ज’चा घोष करीत रस्त्यावर उतरले. ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी वॉशिंग्टन डीसीसह देशांतील 50 राज्यांत तब्बल 2700 ठिकाणी लाखो लोक एकवटल्याचे दिसून आले. ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे तिसरे मोठे आंदोलन आहे. यापूर्वी जुलैमध्येही त्यांच्याविरोधात लोकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. परंतु, हेकेखोर ट्रम्प यांनी त्यापासून कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. सांप्रत आंदोलन हा तर ट्रम्प यांच्या हुकूमशाहीसाठी धोक्याचा इशाराच मानावा लागेल. ट्रम्प यांच्या सत्ताकाळात संसद आणि न्यायपालिका यांच्यातील संघर्षही वाढला आहे. देशात नेमके काय सुरू आहे, हेच कुणाला कळेनासे झाले आहे. गरिबांसाठी असलेल्या आरोग्य सुविधांमध्येही कपात करण्यात आली आहे. देशातील अस्थिरता कमालीची वाढली आहे. या असुरक्षितेतूनच येथील जनमानस एकवटल्याचे दिसते. तसे पाहिल्यास अमेरिकन नागरिक हा लोकशाहीवादी आहे. व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहे. त्यामुळे येथील अध्यक्षाने हुकूमशाही पद्धतीने कारभार करणे कुणालाही मानवणारे नाही. 1776 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेतील राजेशाही संपून देशात लोकशाही व्यवस्था सुरू झाली. त्यामुळे अमेरिकेचा कुणी राजा नाही. या देशात कोणत्याही राजाचा किंवा हुकूमशहाचा आदेश चालणार नाही, असा संदेश या ‘नो किंग्ज’ आंदोलनातून देण्यात येत आहे. अमेरिकन समाजमन किती अस्वस्थ आहे, याचेच हे निदर्शक ठरावे. हा असंतोष असाच वाढत राहिला, तर ट्रम्प यांच्या सत्तेचा शेवटही अत्यंत वाईट पद्धतीने होण्यास वेळ लागणार नाही. अमेरिकेत अनेक ठिकाणी आंदोलन झाले, निदर्शने झाली. पण, आतापर्यंत तरी कुठेही आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे उदाहरण नाही. आंदोलन शांततेत तर पार पडले. याचे श्रेय येथील जनतेला दिलेच पाहिजे. हिंसक आंदोलनांचा प्रभाव हा तात्पुरता असतो. तर अहिंसक व शांततामय मार्गाने होणारी आंदोलने दीर्घकालीन परिणाम करणारी असतात. म्हणूनच आजही जगभरातील अनेक देशांना, तेथील जनतेला वा नेत्यांना महात्मा गांधी यांचा शांततेचा मार्ग आपलासा वाटतो. काळ बदलला, तरी हे शांततेचे महत्त्व कायम असेल. कारण तो शाश्वत असा विचार आहे. मागच्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये उठाव झाल्याची उदाहरणे आहेत. श्रीलंका, नेपाळ ही तर अगदी ताजी उदाहरणे मानावी लागतील. हुकूमशाहीविरोधात किंवा अतिरेकी राष्ट्रवादाविरोधात लोक एकवटत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. ते स्वाभाविकच म्हटले पाहिजे. व्यावहारिक जीवनामध्ये माणसे ही सहकार्यशील असतात. परस्पर साहचर्य हा त्यांच्या जगण्याचा भाग असतो. मात्र, कथित उजवे वा डावे, अतिरेकी राष्ट्रवादी मंडळी अमुक फर्स्ट, तमुक फर्स्टचा नारा देत भेदाभेद, भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करतात. काहींना तेव्हढ्यापुरता यातून आनंद मिळत असला, तरी अशा दऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी धोकादायक असतात. त्यातून या देशातील वर्षानुवर्षाचे जनजीवन, लोकशाही व्यवस्था, सलोखा बिघडतो. आज जगातील अनेक देशांमध्ये हेच सुरू आहे. जागतिक अर्थकारण सुदृढ करण्याऐवजी हे हुकूमशहा कधी उघडउघड, तर कधी लोकशाहीआडून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ट्रम्प यात सर्वोच्च. त्यांचा म्हणूनही एक भक्त समुदाय अमेरिकेत आहे. पण, अशा भक्तांपेक्षा आणि त्यांच्या हुकूमशहांपेक्षा लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे, हे कुणीही विसरता कामा नये.