For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इंडिया’चे रणशिंग

06:53 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इंडिया’चे रणशिंग
Advertisement

लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार, चारसो पार’ची घोषणा देत सर्वशक्तीनिशी प्रचारात उतरलेल्या भाजपाविरोधात आता इंडिया आघाडीनेही जोरदार रणशिंग फुंकल्याचे पहायला मिळते. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीतील विविध पक्षीयांनी पेटविलेली ऐक्याची मशाल, नेत्यांनी पुकारलेला एल्गार अन् भाजपविरोधात दिलेला ‘चले जाव’चा इशारा यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वातावरण निर्माण व्हायला सुऊवात झाली, असे म्हणता येईल. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, देशभरात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिल, तर शेवटचा टप्पा 1 जूनला पार पडणार असून, 4 जूनला निकाल लागेल. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले दिसतात. भाजपा व काँग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी आपल्या दोन उमेदवार याद्या यापूर्वीच घोषित केल्या आहेत. उर्वरित ठिकाणीही भाजप, काँग्रेसह इतर पक्ष लवकरच उमेदवार जाहीर करतील. त्यामुळे येत्या काही दिवसांतच देशातील चित्र स्पष्ट होऊ शकेल. मागच्या काही दिवसांपासून भाजपाने प्रचाराची राळ उडवून दिली आहे. पक्ष स्तरावर 370, तर एनडीए स्तरावर 400 चे लक्ष्य बाळगण्यात आले आहे. त्यादृष्टीकोनातून मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने विकासकामांचा धडाका लावला आहे. तथापि, काहीशा विस्कटलेल्या इंडिया आघाडीनेही पुन्हा सांधत एनडीएविरोधात आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील महासभेच्या माध्यमातून इंडियाने दिलेला इशारा, हा त्याचाच नमुना होय. इंडिया आघाडीतील मुख्य पक्ष म्हणजे काँग्रेस. 2014 पासून अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या या पक्षाला संजीवनी देण्यासाठी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मागच्या काही महिन्यांत बरीच पायपीट केली आहे. काश्मीर ते कन्याकुमारीदरम्यान राहुल यांनी पहिली ‘भारत जोडो यात्रा’ काढली. त्यानंतर त्याचाच दुसरा टप्पा असलेल्या मणिपूर ते मुंबई ‘भारत न्याय यात्रे’चा समारोप शिवाजी पार्कवर झाला. यातून एक वर्तुळ पूर्ण झाले असले, तरी सत्तेच्या वर्तुळात जाण्यासाठी अहंभाव सोडून विविध पक्षांची मोट बांधावी लागेल, याची जाणीव काँग्रेसवाल्यांना आली असावी. त्यामुळे जिथे कुठे तडजोड शक्य आहे, तिथे त्यांनी ती केल्याचे दिसून येते. यासाठी बऱ्याच ठिकाणी त्यांनी कमीपणा घेतला असेल, तर त्यांना वास्तवाची जाणीव येऊ पाहतेय, असे म्हणायला हरकत नाही. अर्थात पश्चिम बंगालसारख्या राज्यात तृणमूल सोबत समझोता झाला नसला, तरी त्याचे अपश्रेय ममतादीदींच्या हटवादीपणास जाते. पंजाबमध्ये भाजपाचे फारसे अस्तित्व नाही. हे पाहता तेथे काँग्रेस व आप वेगवेगळे लढत असतील, तर तेही समजून घ्यायला हवे. विळ्या भोपळ्याचे सख्य असलेल्या या पक्षांची अन्यत्र झालेली आघाडी ही त्यांच्यादृष्टीने सकारात्मक बाबच ठरावी. यूपी हे देशातील सर्वांत मोठे राज्य. तेथे लोकसभेच्या तब्बल 80 जागा आहेत. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने येथून निर्भेळ यश मिळविले आहे. हे पाहता काँग्रेस व सपामध्ये झालेली आघाडी महत्त्वपूर्ण होय. बिहारमध्ये राजद, महाराष्ट्रात ठाकरे सेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी, तामिळनाडूत द्रमुक यांच्यासह काश्मिरातील पक्षांशीही मैत्र जुळविण्याची किमया पक्षाने साधली आहे. स्वाभाविकच मागच्या वेळी 50 पर्यंत जागा सीमित असलेल्या या पक्षाला या खेपेला अधिकच्या जागांचे स्वप्न पडत असेल, तर ते अवास्तव ठरू नये. त्या अर्थी राहुल यांचे शिवाजी पार्कवरील भाषणही आत्मविश्वासपूर्ण ठरावे. इव्हीएमबाबत त्यांनी उपस्थित केलेली शंका पाहता त्यांचा येत्या निकालावर विश्वास असेल का, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण करतो. आता निवडणूक प्रचारात ते आपले मुद्दे किती प्रभावीपणे मांडतात, यावरही बरेच काही अवलंबून असेल. शिवाजी पार्क आणि सेना हे समीकरणच. एरवी येथून सेनेचा आवाज घुमत असतो. तथापि, या खेपेला इंडिया आघाडीसह तो घुमला, हे विशेष. शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे यांच्या हातातून शिवसेनेचा धनुष्यबाण निसटला असला, तरी खरी लढाई अजून व्हायची आहे. त्याकरिता उद्धव हेही सरसावलेले दिसतात. लोकशाही रक्षणाची ही लढाई असल्याचा ठाकरे यांचा इशारा, ‘चले जाव’चा पवारांचा नारा, निवडणूक रोखे हा भ्रष्टाचार असल्याचा स्टॅलिन यांचा आरोप यातून इंडिया आघाडीतील घटक पक्ष आक्रमक मूडमध्ये असल्याचे दिसून येते. तसे पाहिले, तर इंडिया आघाडीमध्ये अंतर्विरोधही बरेच आहेत. त्यातूनच मधल्या काळात त्यांच्यात बेबनाव झाला होता. आता पुन्हा ही मंडळी एकवटली असली, तरी ही एकी टिकणार काय, निवडणुकीला सर्वजण एकोप्याने सामोरे जाणार काय, या साऱ्याला बरेच महत्त्व असेल. निवडणूक रोख्यातून त्या-त्या पक्षांना किती निधी मिळाला, याचा तपशील नुकताच निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात 6986 कोटीसह भाजप आघाडीवर आहे. तृणमूलला 1397, काँग्रेसला 1334, भारत राष्ट्र समितीला 1322, तर द्रुमकला 656 कोटी इतका निधी मिळाल्याची आकडेवारी सांगते. हे आकडेच काय ते बोलतात. खरे तर देशात सध्या भाजपाची हवा आहे. मोदी यांच्या नावाची जादू आजही कायम असल्याचे दिसते. 370, राम मंदिर, सीएए हे आपल्या अजेंड्यावरील विषय मार्गी लावणाऱ्या या पक्षाने प्रचाराचा धडाकाच लावून दिला आहे. एकूणच काय तर भाजपासाठी सध्याचे वातावरण हे वेल अँड गुड आहे. हे वातावरण भेदून स्वत:चा मार्ग प्रस्थापित करणे, हे वाटते तितके सोपे नाही, याची जाणीव इंडिया आघाडीतील पक्षांनी ठेवली पाहिजे. तशी फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी आहे, यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, एकूणच लढाईचा विचार करता इंडियाचा चांगलाच कस लागणार, हे नक्की.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.