ट्रंपविजय
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रंप यांचा मोठा विजय झाला आहे. त्या देशात मतमोजणी अद्याप पूर्ण झाली नसली, तरी बहुमतासाठी आवश्यक 270 किंवा त्याहून अधिक ‘निवडवृंद’ मते ट्रंप यांनी निर्विवादपणे मिळविली असल्याने तेच राष्ट्राध्यक्षपदी आरुढ होणार हे निश्चित झाले आहे. ज्या प्रांतांमध्ये मतमोजणी बुधवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण झालेली नव्हती, त्या प्रांतांमध्येही ते आघाडीवर होते. त्यामुळे ते डेमॉव्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर आणखी मोठी आघाडी घेण्याच्या स्थितीत आहेत. ट्रंप यांच्या या शानदार विजयाचे अनेक आयाम असून या विजयाचे परिणामही अमेरिकेच्या आणि जगाच्या राजकारणावर तसेच अर्थकारणावरही बरेच होणार आहेत. पण त्यांचा विचार करण्याआधी एक बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे. ती अशी, की याही निवडणुकीत मतदानपूर्व सर्वेक्षणे सपशेल आपटली आहेत. मतदानाच्या दिवसापूर्वी, अर्थात मंगळवारपूर्वीपर्यंत अनेक संस्थांनी त्यांच्या सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले होते. सत्तर टक्क्यांहून अधिक सर्वेक्षणांमध्ये कमला हॅरिस यांना आघाडी दाखविण्यात आली होती. अमेरिकेतील ज्या सात प्रांतांवर निवडणुकीचा निर्णय अवलंबून असतो, अशा ’स्विंग स्टेट्स्’पैकी 3 ते 4 मध्ये कमला हॅरिस आघाडी घेतील, अशी भविष्यवाणी या सर्वेक्षणकारांनी केली होती. तीही खोटी ठरली. ट्रंप यांनी सातही अशी राज्ये आपल्या खिशात टाकल्याचे दिसते. याचाच अर्थ असा की ही निवडणूक प्रथम मोठा गाजावाजा करण्यात आला, तशी ‘डाऊन टू दी वायर’ किंवा अतिचुरशीची झालीच नाही. ट्रंप यांना तुलनेने सहज विजय मिळाला. आणखी एक मुद्दा असा की कमला हॅरिस निवडून याव्यात यासाठी ‘देव पाण्यात घालून’ बसलेल्या आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या ‘लेफ्टिस्टस्’ किंवा डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांची, तसेच विचारवंतांचीही घोर निराशा झाली. या विचारवंतांनी त्यांच्या हाती असलेल्या प्रसार माध्यमांमधून हॅरिस यांच्या नावाचा जयघोष करण्याची तसेच ट्रंप यांची निंदानालस्ती करण्याची जणू स्पर्धाच लावली होती. तो प्रचारी थाट वाया गेला. यावरुन हे स्पष्ट होते, की आपणच जनहिताचे कैवारी आहोत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता आपलेच ऐकते आणि त्याप्रमाणे करते, हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा पुन्हा एकदा फुटला. वास्तविक भारताचा किंवा भारतवासी नागरिकांचा या निवणुकीशी थेट संबंध नव्हता. तरी भारतातील काही प्रसारमाध्यमांनीही हॅरिस यांचा डंका गेले दोन महिने पिटला होता. तथापि, त्यांच्या हातीही काही लागले नाही. या मुद्द्याचा उल्लेख मुद्दाम अशासाठी केला, की, केवळ भारतातच नव्हे, तर जगातही अशा पुरोगामी माध्यमबाजांकडून उजव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांच्या विरोधात अपप्रचार केला जातो. जनतेला प्रबोधनाच्या माध्यमातून नव्हे, तर तिची सातत्याने दिशाभूल करुन आपल्या विचारसरणीकडे खेचण्याचा जो उद्योग ही मंडळी अव्याहतपणे करतात, ते त्यांचे तंत्र याहीवेळी फसले आहे. त्यांच्या ‘प्रोपोगेंडा टॅक्टिक्स’ला किंवा ‘नॅरेटिव्ह सेटींग’ला आता हरियाणापासून अमेरिकेपर्यंत कोणत्याही भागांमधील मतदार भीक घालत नाहीत, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. महत्त्वाचा मुद्दा ट्रंप यांच्या विजयाचा भारतावर, जगावर आणि अमेरिकेवर काय होईल, हा आहे. भारताचे सांगायचे तर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आता अशा पातळीपर्यंत पोहचले आहेत, की अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोणीही निवडून आले तरी हे संबंध ‘पातळ’ होण्याची शक्यता नाही. कारण हे संबंध व्यक्तीकेंद्रीत नसून धोरणात्मक आहेत. तरीही, कमला हॅरिस निवडून आल्या तर त्यांचा धाक दाखवून भारतात केंद्रीय सत्तास्थानी असलेल्यांचे हात पिरगाळणे, आपल्याला सोपे जाईल, अशी आशा अनेकांना होती. ती फोल ठरली, हे बरे झाले. ट्रंप यांचा भारताला लाभ किती होईल, हे त्यांच्या धोरणावर अवलंबून राहील. पण निदान त्रास होणार नाही. अशी आशा भारताला धरता येईल. बांगला देशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध ट्रंप यांनी निवडणूक प्रचार काळात जाहीररित्या केला होता. तसेच अन्यायग्रस्त हिंदूंचे संरक्षण करु, अशी घोषणाही केली होती. ती त्यांनी आचरणात आणली तर, खरोखरच जगभरातील हिंदू त्यांचे आभारी राहतील, हे निश्चित आहे. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंना आज खरोखरच एका भक्कम आंतरराष्ट्रीय पाठीराख्याची आवश्यकता आहे. ट्रंप यांनी ती पुरविली, तर ते त्यांचे कृत्य महत्प्रशंसनीय ठरेल. जगाच्या राजकारणावरही या विजयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. युक्रेन-रशिया युद्ध, चीनचा विस्तारवाद आणि मध्यपूर्वेत इस्रायल आणि हमास-हिजबुल्ला संघर्ष, तसेच इराणपुरस्कृत आणि पाकिस्तानपुरस्कृत इस्लामी दहशतवाद संपविणे आदी मुद्द्यांवर ट्रंप यांनी खंबीर भूमिका घेतली, तर त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदावरचा त्यांचा हा द्वितीय आणि अंतिम कार्यकाल गाजवला असेच म्हणावे लागेल. ट्रंप यांच्यासमोरचे मुख्य आव्हान मात्र, प्रत्यक्ष अमेरिकेची आर्थिक गाडी रुळावर आणणे आणि ती वेगाने धावू लागेल अशी स्थिती निर्माण करणे, हे आहे. कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावली, तर साऱ्या जगाला चटके बसतात. अमेरिका हे सध्या जगातील सर्वात मोठे आर्थिक बलस्थान आहे. तसेच ते तंत्रवैज्ञानिक संशोधनाचेही आगर आहे. ही अमेरिकेची वैशिष्ट्यो ट्रंप यांनी जोपासल्यास आणि सुपोषित केल्यास केवळ अमेरिकेचे नव्हे, तर जगाचेही भले होणे शक्य आहे. अर्थात, हा झाला सकारात्मक अपेक्षांचा भाग. प्रत्यक्षात ते काय करतात आणि काय करु शकतात, हे येत्या काहीकाळात समजणार आहे. त्यांनी केवळ अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे असे नाही. तर अमेरिकेचे कनिष्ठ सभागृह आणि सिनेटमध्येही आता त्यांच्या पक्षाने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. त्यामुळे पुढची दोन वर्षे तरी त्यांना कोणत्याही देशांतर्गत अडथळ्याविना प्रशासन चालविणे सुलभ होणार आहे. कमला हॅरिस यांच्यासंदर्भात सांगायचे तर, त्यांनी प्रयत्न पुष्कळ केले. मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेन उमेदवार असते तर ही निवडणूक एकांगी होण्याची शक्यता होती. हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे निदान प्रचारकाळात तरी चुरशीचे वातावरण निर्माण झाले. त्या निवडून आल्या असत्या तर अमेरिकेच्या इतिहासातील त्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्या असत्या. पण, अमेरिकेतल्या मतदारांनी महिलेला सर्वोच्चपद न देण्याची परंपरा पाळली, हे देखील या निवडणुकीचे वैशिष्ट्या म्हणावे लागेल. असो. डोनाल्ड ट्रंप यांना त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळासाठी शुभेच्छा!