ट्रम्पना 10 जानेवारीला शिक्षा सुनावणार
पॉर्न स्टारला पैसे दिल्यासंबंधीचे प्रकरण
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शपथविधीपूर्वी नव्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणातील न्यायाधीश जुआन मार्चेन यांनी यासंबंधी माहिती दिली असून शिक्षेच्या सुनावणीवेळी ट्रम्प प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअली न्यायालयात हजर राहू शकतात. गेल्यावर्षी मे महिन्यात मॅनहॅटन न्यायालयाने ट्रम्प यांच्यावर 34 आरोप निश्चित केले होते. त्यात 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला लैंगिक संबंध सार्वजनिक करण्यापासून गप्प बसवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप होता.
ट्रम्प यांना शिक्षेची तारीख 10 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी ही सुनावणी होणार आहे. गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरलेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. तथापि, ट्रम्प यांनी हे प्रकरण अन्यायकारक असल्याचे म्हणत न्यायाधीशांवर पक्षपात आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. 20 जानेवारी रोजी वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित समारंभात ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये 52 जागांसह बहुमत मिळवले आहे, तर डेमोक्रॅट्सकडे 47 जागा आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्येही रिपब्लिकन पक्ष 216 जागांसह आघाडीवर आहे, तर डेमोक्रॅट्सकडे 209 जागा आहेत.