पोप लियो यांच्यावर निशाण्यावर ट्रम्प
झेलेंस्की यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र
वृत्तसंस्था/ कीव्ह
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाकडून दीर्घकाळापासून चालत आलेल्या अमेरिका-युरोपीय भागीदारीला तोडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप ख्रिश्चनांचे धर्मगुरु पोप लियो 14 वे यांनी केला आहे. पोपकडून उघड टीका करण्यात आल्याने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. ट्रम्प यांनी युरोपीय देश कमजोर झाल्याचा दावा करत युक्रेनला मिळणारे अमेरिकेचे समर्थन कमी करण्याचे संकेत दिले होते. युक्रेन शांतता करारात युरोपची भूमिका असायला हवी असे पोप लियो 14 वे यांनी या मुद्द्यासंबंधी बोलताना म्हटले आहे. पोप लियो यांचा कीव्ह दौरा युरोपीय समर्थन जमविण्याचा प्रयत्न मानला जातोय. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची भेट झाल्यावर युद्धविरामाची आवश्यकता आणि रशियाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या युक्रेनियन मुलांच्या वापसीसाठी व्हॅटिकनच्या प्रयत्नांबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
युरोपला चर्चेत सामील न करता शांतता करण्याचा प्रयत्न अवास्तविक आहे. कारण युद्ध युरोपमध्ये सुरू आहे. आज आणि भविष्यात सुरक्षेची हमी देखील मागण्यात येत आहे. युरोपला याचा हिस्सा असायला हवे आणि दुर्दैवाने प्रत्येक जण ही स्थिती समजत नाही, पण युरोपीय नेत्यांनी एकजूट होत तोडगा काढण्याच ही एक उत्तम संधी असल्याचे पोप लियो यांनी म्हटले आहे.
ट्रम्प प्रशासनाने मांडलेला प्रस्ताव पाहता युरोप आणि अमेरिकेदरम्यान मागील अनेक वर्षापासून चालत आलेल्या खऱ्या आघाडीत मोठा बदल घडणार असल्याचे मानले जातेय. याचबरोबर ट्रम्प यांच्या काही टिप्पणी पाहता आज आणि भविष्यात ज्या आघाडीची गरज आहे, त्याला तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वाटते असे उद्गार पोप लियो यांनी काढले आहेत.