ट्रम्प समर्थक किर्कची जाहीर सभेत हत्या
रुढिवादी कार्यकर्त्यावर झाडली होती गोळी : हल्लेखोर अद्याप फरार : सभास्थानी गोळीबारानंतर पळापळ
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सहकारी आणि रुढिवादी कार्यकर्ता चार्ली किर्कची एका जाहीरसभेत गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. 31 वर्षीय किर्क स्वत:ची संस्था टर्निंग पॉइंट युएसएच्या एका कॉलेज कार्यक्रमाचे आयोजन करत असताना गोळी झाडून त्याचा जीव घेण्यात आला आहे. गोळीबार होताच यूटाह विद्यापीठ परिसरात त्वरित लॉकडाउन करण्यात आले. याप्रकरणी प्रारंभी एका इसमाला ताब्यात घेण्यात आले होते, परंतु नंतर अधिकाऱ्यांनी खरा गुन्हेगार अद्याप फरार असल्याचे सांगितले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर यूटाह व्हॅली विद्यापीठाच्या परिसराला ‘सिक्योर इन प्लेस’ आदेश जारी करत बंद करण्यात आले. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा संशयित हल्लेखोराचा शोध घेत आहेत. गोळीबार कुणी केला अद्याप समोर आलेले नाही. हा गोळीबार एखाद्या प्रशिक्षित शूटरने केल्याचा दावा करण्यात येत आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी महान चार्ली र्किकला श्रद्धांजली वाहत अमेरिकेच्या युवांच्या मनाला चार्लीपेक्षा अधिक चांगले कुणीच समजू शकत नव्हता, असे म्हटले आहे.चार्ली जेम्स किर्क अमेरिकचा सर्वात चर्चेत राहणारा रुढिवादी कार्यकर्ता आणि प्रसारमाध्यमांमध्ये झळकणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक होता. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तो विश्वासू सहकारी होता. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने टर्निंग पॉइंट ही संस्था स्थापन केली होती. उदारमतवादाकडे झुकलेल्या अमेरिकेच्या कॉलेजमध्ये रुढिवादी आदर्शांचा प्रसार करणे हा त्याचा यामागील उद्देश होता. यूटाह व्हॅली विद्यापीठात बुधवारी त्याची हत्या करण्यात आली. विद्यापीठात तो अमेरिकेतील गन कल्चर, अमेरिकेतील वाढती गुन्हेगारी यासारख्या मुद्द्यांवर विचार मांडण्यासाठी आला होता. शूटरने थेट गळ्याच्या दिशेने गोळी झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ग्रीनलँडचा केला होता दौरा
चालू वर्षाच्या प्रारंभी किर्कने ट्रम्प यांचा पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरसोबत ग्रीनलँडचा दौरा केला होता. आर्क्टिक क्षेत्रावर अमेरिकेची मालकी असावी अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली होती. ग्रीनलँडवरील ट्रम्प यांच्या भूमिकेचे समर्थन करणे देखील किर्कच्या मृत्यूचे मोठे कारण असू शकते.
अश्वेतांबद्दलची वादग्रस्त वकतव्यं
किर्क अनेकदा स्वत:च्या पॉडकास्टमध्ये अश्वेतांना अमेरिकेतील गुन्ह्यांसाठी जबाबदार ठरवत होता. तसेच प्रसारमाध्यमे सत्य दाखवत नसल्याचा आरोप तो करायचा. अमेरिकेत वर्णद्वेष अन् गुन्ह्यांमागे अश्वेतांचाच सर्वाधिक हात असल्याचा दावा त्याने वारंवार केला होता. भारतीयांना अमेरिकेने व्हिसा देणे आता बंद करावे असे देखील किर्कने म्हटले होते. किर्क हा इस्रायलचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जात होता.
ट्रम्प यांच्या विजयात हातभार
मागील वर्षी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प आणि अन्य रिपब्लिकन उमेदवारांसाठी प्रचारमोहिमेत किर्कच्या या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हजारो नव्या मतदारांची नोंदणी करणे आणि एरिझोनाला ट्रम्प यांच्या बाजूने वळविण्याचे व्यापक श्रेय किर्क यालाच देण्यात आले. ट्रम्प यांच्या विजयानंतर किर्क आणि त्यांचे संबंध अधिकच दृढ झाले होते. जानेवारी महिन्यात ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात किर्क सामील झाला होता. किर्कचा विवाह एरिझोनाची ब्युटी क्वीन एरिका लेन फ्रांटज्वेसोबत झाला होता, या दांपत्याला दोन अपत्यं आहेत.