अमेरिकेच्या संसदेतील हिंसेसाठी ट्रम्प जबाबदार
तपास समितीचा निष्कर्ष ः 1 हजार प्रत्यक्षदर्शींची नोंदविली साक्ष
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
युएस कॅपिटल हिल (अमेरिकेची संसद) हिंसा प्रकरणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तपास करत असलेल्या काँग्रेस समितीने ट्रम्प यांना दोषी ठरविले आहे. ही हिंसा 6 जानेवारी 2021 रोजी झाली होती, अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बिडेन यांनी शपथ घेण्यापूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला होता. ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी संसद भवनात शिरून तोडफोड आणि जाळपोळ केली होती.
काँग्रेस समितीने सोमवारी स्वतःचा 154 पानांच्या अहवालात ट्रम्प यांच्या विरोधात गुन्हेगारी खटला चालविण्याची शिफारस केली आहे. या समितीने 1 हजार प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदविली होती.
ट्रम्प यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तपास समिती ज्याप्रकरणाचा तपास करत आहेत, त्यासंबंधी यापूर्वीच माझ्याविरोधात महाभियोग चालविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुन्हा तेच आरोप करत मला आणि रिपब्लिकन पार्टीविरोधात कट रचला जात असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
काँग्रेस समितीने ट्रम्प यांच्यावर चिथावणी देणे, अधिकृत कारवाईत अडथळे आणणे, कट रचणे, खोटी वक्तव्ये करणे आणि प्रशासनाची फसवणूक करण्याचे आरोप केले आहेत. याचबरोबर अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवाचा निर्णय पालटविणे, कराशी निगडित प्रकरण लपविणे आणि व्हाइट हाउसमधून गोपनीय दस्तऐवज सोबत नेण्याच्या प्रकरणांचा तपासही केला जात आहे.
तपास समितीच्या अहवालातील शिफारसी मान्य करणे अनिवार्य नाही. याचा अर्थ ट्रम्प यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवावा की नाही याचा निर्णय न्याय विभाग घेणार आहे. काँग्रेस समितीची स्थापना 18 महिन्यांपूर्वी झाली होती. ही समिती ट्रम्प यांच्यासह त्यांच्या 5 सहकाऱयांवर झालेल्या आरोपांचीही चौकशी करत आहे. या सर्वांवर कॅपिटल हिंसेला चिथावणी देण्याचा आरोप आहे. काँग्रेस समितीत डेमोक्रेटिक पार्टीचे 7 खासदार तर रिपब्लिकन पार्टीचे 2 खासदार सामील आहेत. या समितीचे अध्यक्ष बेनी थॉम्पसन आहेत.