भारतीय अमेरिकनांमध्ये ट्रम्प लोकप्रिय
डेमोक्रेटिक पार्टीबद्दल होतोय अपेक्षाभंग : ट्रम्प यांच्यासाठी वाढले समर्थन : सर्वेक्षणाचा नि
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय अमेरिकन लोकांना पारंपरिक स्वरुपात डेमोक्रेटिक पार्टीचे समर्थक म्हणून ओळखले जाते. परंतु आता एका नव्या सर्वेक्षणात भारतीय अमेरिकन लोकांचा डेमोक्रेटिक पार्टीबद्दल काही प्रमाणात अपेक्षाभंग झाला असून अनेक भारतीय आता रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करत आहेत. रिसर्च अँड अॅनालिटिक्स फर्म युगोव्हसोबत मिळुन कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस सेंटरकडून एक सर्वेक्षण करण्यात आले असून याला ‘2024 इंडियन-अमेरिकन एटीट्यूड्स’ नाव देण्यात आले आहे.
अद्याप मोठ्या संख्येत भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक डेमोक्रेटिक पार्टीचे समर्थन करत आहेत. परंतु यावेळी भारतीय अमेरिकन मतदारांमध्ये रिपब्लिकन पार्टीसाठी समर्थन वाढले आहे. अनेक लोक यावेळी ट्रम्प यांचे समर्थन करत आहेत असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. हे सर्वेक्षण 18 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान 714 भारतीय अमेरिकन नागरिकांसोबत करण्यात आले होते. सर्वेक्षणात त्रुटीचे एकूण मार्जिन प्लस किंवा मायनस 3.7 टक्के आहे.
सर्वेक्षणानुसार नोंदणीकृत भारतीय अमेरिकन मतदारांपैकी 61 टक्के जण कमला हॅरिस यांना मतदान करण्याची योजना आखत आहेत. तर 32 टक्के भारतीय हे ट्रम्प यांना मतदान करण्याच्या विचारात आहेत. सर्वेक्षणानुसार 2020 च्या तुलनेत ट्रम्प यांना मतदान करण्यास इच्छुक भारतीय अमेरिकनांच्या हिस्सेदारीत वाढ झाली आहे. 67 टक्के भारतीय-अमेरिकन महिला कमला हॅरिस यांना मतदान करण्याच्या विचारात आहेत. तर 53 टक्के पुरुष हे हॅरिस यांना समर्थन दर्शवत आहेत. तर 22 टक्के भारतीय महिला ट्रम्प यांच्या बाजूने दिसून आल्या. तर 39 टक्के पुरुष ट्रम्प यांच्यासाठी मतदान करण्याची योजना आखत आहेत. रिपब्लिकन पार्टीची अल्पसंख्याकांबद्दलची भूमिका, गर्भपात आणि विशिष्ट धर्म सर्वोच्च मानणाऱ्या विचारसरणीशी सहमत नसल्याचे डेमोक्रेटिक पार्टीचे समर्थक असलेल्या भारतीय अमेरिकनांचे सांगणे आहे.
अत्यंत प्रभावी समुदाय
अमेरिकेत भारतीय वंशाचे 52 लाखाहून अधिक लोक राहतात. 2022 च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत सुमारे 26 लाख भारतीय-अमेरिकन मतदार आहेत. भारतीय अमेरिकनांचे सरासरी उत्पन्न जवळपास 1,53,000 डॉलर्स आहे. अमेरिकेतील अन्य समुदायांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पटीपेक्षाही अधिक आहे. नोंदणीकृत भारतीय-अमेरिकन मतदारांपैकी 96 टक्के जण नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याची शक्यता आहे. भारतीय-अमेरिकन आता अमेरिकेतील दुसरा सर्वात मोठा स्थलांतरित समूह आहे. समुदायाची तीव्र लोकसंख्यात्मक वृद्धी, अध्यक्षीय निवडणुकीतील चुरशीची लढत आणि भारतीय-अमेरिकनांच्या उल्लेखनीय व्यावसायिक यशामुळे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अत्यंत प्रभावी ठरले आहेत.
डेमोक्रेटिक पार्टीवर नाराजी
भारतीय अमेरिकन नागरिक हे काही प्रमाणात डेमोक्रेटिक पार्टीवर नाराज असल्याचे मानले जात आहे. इस्रायल-हमास संघर्षादरम्यान अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये झालेल्या निदर्शनांना वेळीच न रोखता आल्याचा मुद्दा सध्या प्रभावी ठरत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा मुद्दाही या निवडणुकीत प्रभावी ठरणार आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होणार असून यात तेथील स्विंग स्टेट्स अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. तेथील निकालच अध्यक्ष कोण होणार हे प्रामुख्याने ठरवणार आहे.