खरा न्याय.......
एका गावात तीन व्यापारी मित्र राहत होते. एकाचं नाव शरद, दुसऱ्याच नाव उद्धव आणि तिसऱ्याच नाव संजय, या तिघांनीही व्यापार करण्याचं ठरवलं. तिघांनी ठरवून भागीदारी स्वीकारली आणि कापसाचा व्यापार करूया म्हणून एकमत झालं. कापसासाठी मोठं गोडाऊन लागणार होतं, मोठे दुकान लागणार होते, हे सगळं घेऊन त्यांनी वाजत गाजत या सगळ्याचं उद्घाटन केलं. अनेक पेपरमध्ये जाहिराती दिल्या आणि आपल्या धंद्याला सुरवात केली. वेगवेगळ्या देशांचे दौरे केले. कापसाला कुठे मागणी जास्त येईल, कुठे आपल्याला जास्त फायदा मिळेल याचा अभ्यास सुरू केला. पण यासाठी खूप पैसा ओतायला लागणार होता. यासाठी विदेशात ओळख असलेला एखादा भागीदार त्यांना व्यापारी म्हणून घ्यायला लागणार होता. त्यांच्यासमोर मल्ल्याचं नाव आलं. ह्याला त्यांनी व्यापारात भागीदार म्हणून स्विकारलं. आता हा व्यापार सुरू करण्याच्या दिवशीच त्या गोडाऊनमध्ये एक मांजर राहायला आले होते. ते मांजर त्यांना शुभ शकुन वाटले आणि प्रत्येकाने या मांजरीची काळजी घ्यायची असं ठरवलं. त्यांनी घेतलेला चौथा भागीदार म्हणजे मल्ल्या ह्याचं अनेक राजकारण्यांशी, बँकांशी, जगभरात संधान होतं. तो सगळे नियम धाब्यावर बसवून वाट्टेल तेवढा पैसा उपलब्ध करू शकत होता. आणि विदेशामध्ये माल पाठवू शकत होता. त्याच्यामुळे ह्यांच्या व्यापाराला बरकत येणार होती हे नक्की झालं. आता या मांजरीची काळजी प्रत्येकजण घेऊ लागला. प्रत्येकाने या मांजरीचा एक-एक पाय स्वत:च्या नावे करून टाकला. त्याचा इन्शुरन्स काढला आणि मांजरीची देखभाल सुरू झाली. जसजसं मांजर मोठ होत होतं तस तसा धंदासुद्धा वाढत होता. असं करता करता काही वर्षांनी दिवाळी आली. अर्थातच दिवाळीचा उत्सव सगळीकडेच उत्साहाने साजरा होत असताना या मांजरीच्या पायाला काहीतरी जखम झाली. ज्या पायाला जखम झाली तो पाय मल्ल्या नावाच्या व्यापाऱ्याच्या वाट्याचा होता. त्यांनी अर्थातच चांगल्या तज्ञ डॉक्टरांना दाखवून तिच्या पायावर उपचार सुरू केले. त्याला बँडेज बांधलं आणि सगळं पुन्हा पूर्ववत सुरु झालं. इकडे दिवाळीच्या निमित्ताने सगळीकडे पणत्या लावलेल्या होत्या, फटाके वाजत होते, सगळे प्राणी सैरावैरा धावत होते, मांजर त्याला अपवाद नव्हती. एकदा असंच पळताना एका पणतीला मांजरीचा पाय लागला. तिथल्या ज्योतीला पाय लागून तिच्या पायाला बांधलेली पट्टी आता पेटली होती. मांजर खूप घाबरली आणि पटकन उड्या मारत गोडाऊनमध्ये आली. आवाज कमी झाले पण गोडाऊनमध्ये आल्यानंतर तिच्या पेटलेल्या पायाने सगळा कापूस पेटला. संपूर्ण गोडाऊन पेटलं आणि धंद्याचं मोठं नुकसान झालं. प्रचंड आग आटोक्यात आणण्यासाठी दोन-तीन दिवस सगळे लोक झटत होते. अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या होत्या, वार्ताहर आले होते, सगळीकडे बातमी पसरली. बिचाऱ्यांचा व्यापार बुडाला म्हणून सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. आता चौघेही जण एका तातडीच्या मीटिंगसाठी दुकानात बसले. कोणामुळे ही आग लागली हे शोधून काढलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मांजरीच्या पायाला जी पट्टी बांधली आहे त्याच्यामुळे ही आग लागली असणार. झालं आता या चौघांच्यात भांडण सुरू झालं. ज्या पायामुळे आग लागली त्या पायाला म्हणजेच मल्ल्याला दोषी ठरवलं गेलं. भांडण शेवटी सुप्रीम कोर्टात गेलं. झालेल्या नुकसानीचा सर्व खर्च मल्ल्याने द्यावा अशी ह्या तिघांनीही मागणी केली. मग कोर्टात गेल्यानंतर वकिलांनी सगळ्यांची बाजू नीट ऐकून घेतली. सगळ्या घटनेचा अभ्यास नीट केला आणि मग नंतर त्यांनी काही दिवसांनी निकाल देणार असं सांगितलं. निकालाचा दिवस आला. त्या दिवशी तिथे चौघेही जण हजर होते. वकील साहेब नक्कीच मल्याला शिक्षा करणार हे तिघांनी मनोमन जाणलेलं होतं. तिघेही जण उत्तम तयारीचे राजकारणी असल्यामुळे त्यांनी या व्यापाऱ्याला आपल्यासाठी अडकवलेलं होतं आणि आता ते निकालाची वाट बघत होते. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. त्यामध्ये लिहिलेलं होतं ज्या पायामुळे आग लागली, त्यामुळेच हे सर्व प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणजेच मल्ल्या यासाठी दोषी आहे. तिघांनाही अतिशय आनंद झाला. पण अजून निकाल पत्र पूर्ण वाचून व्हायचं होतं. जज्ज साहेबांनी पुढचं निकालपत्र वाचायला सुरुवात केली. जो पाय जखमी होता तो चालू शकत नसल्याने, मांजर तो पाय उचलून चालू शकत नव्हती. ह्या पायाला आत घेऊन जाण्याचं काम उरलेल्या तीन पायांनी केल्यामुळे तीनही पाय सगळ्यात जास्त दोषी आहेत. आणि म्हणूनच झालेल्या नुकसानीची भरपाई या तिघांनी द्यावी, असं कोर्टाने सांगून ही केस संपवली. जळलेला पाय सुखरूप होता आणि उरलेले तीन पाय मात्र मनातल्या मनात चरफडत होते. हा व्यापारी इथला सगळा व्यापार गुंडाळून विदेशात केव्हाच पळून गेलेला होता. बाकीचे तीन मात्र हात चोळत बसले होते. आणि कुणी किती पैसे भरायचे याचा हिशोब ठरवत होते. खरा न्याय झाला होता हे मात्र खरं.