पोकळ पुतळा, ठोकळ अहवाल!
मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना स्थापत्य आराखडा, संकल्पचित्र तयार करण्यात आले नव्हते तसेच वेल्डिंग नीट झाले नाही, पुतळ्याची देखभालसुद्धा व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी गंज चढला आणि कमकुवत साच्यामुळे हा पुतळा कोसळला असा अहवाल चौकशी समितीने पुतळा पडल्यानंतर एक महिन्याने दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेला अगदी पहिल्या दिवशी हे सत्य माहीत होते. सुत्रांच्या हवाल्याने बाहेर पडलेल्या माहितीनुसार संरचनात्मक त्रुटी आणि पुतळ्याची चुकीच्या पद्धतीने केलेली उभारणी यामुळे ही दुर्घटना घडली, असे अहवालात नमूद आहे. मात्र केवळ यामुळे देशभरातील शिवभक्तांचा संताप, राग दूर होणार नाही. मुळात प्रमाणबद्धता, कलात्मकता आणि शरीर शास्त्राचा अभ्यास या पुतळ्यामध्ये दिसत नाही. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व या पुतळ्यामध्ये कुठेही अधोरेखित होत नाही. वस्त्रs व अलंकार छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशे नाहीत. अशा अनेक त्रुटीमुळे हा पुतळा खरे तर उभारण्याआधीच नाकारला पाहिजे होता. परंतु तसे झाले नाही. पुतळ्यामध्ये वापरलेल्या धातूंचे परीक्षण व्हायलाच हवे. पुतळ्याचे संपूर्ण नियोजन, संकल्पना स्थापत्य निरीक्षण आणि गुणवत्ता निरीक्षणाची जबाबदारी नौदलावर सोपवली होती. त्यांनी कसे खपवून घेतले याचा जाब विचारला पाहिजे. अहवाल म्हणतो, समुद्रकिनाऱ्याची खारी हवा लक्षात घेऊन लोखंडावर योग्य प्रक्रिया करण्याची गरज असताना ती केली नव्हती, दोन भाग जोडताना केवळ एक बाजूला पट्टी लावून वेल्डिंग करण्यात आले होते तसेच पुतळ्याची देखभाल व्यवस्थित न झाल्याने गंज चढला होता. गंज, कमकुवत वेल्डिंग आणि सदोष स्थापत्य कामे यामुळे ही दुर्घटना घडली आहे! असा निष्कर्ष समितीने काढला आहे. आता सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. या उभारणीतील त्रुटीबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती दुर्घटना घडलेल्या दिवसापासून बोलत होता. खारी हवा आणि वाऱ्याच्या गतीबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलले होते. मग समितीने नेमके काय केले? ते 16 पानातील प्रत्येक ओळ जगजाहीर झाल्याशिवाय समजणार नाही. इ. स. चौथ्या ते सातव्या शतकापासूनचा अजंठाचा ज्या महाराष्ट्राला शिल्पकलेचा जागतिक वारसा आहे तेथे, जिथे 1857 पासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट सारखी संस्था आहे, ज्या राज्यातील शिल्पकारांनी संसदेत भव्य दिव्य पुतळे उभे केले आहेत आणि ज्या राज्यात 1965 सालापासून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभा करताना त्याची कलासंचालनालयाकडून तज्ञांच्या चौकशीला सामोरे जाऊन मान्यता घेण्याची पद्धत रूढ आहे, तिथे ही दुर्घटना झाली आहे. पुतळ्याला गंज चढतो याचा अर्थ पंचधातूचे ओतकाम योग्य पद्धतीने झालेले नाही हे सहज स्पष्ट होते. कलासंचालनालयाला सादर केलेले स्केल मॉडेल हे छोटेच असते. मात्र संचालकांनी आपण त्या विषयातील तज्ञ नसू तर शिल्पकारांची समिती नेमून मग त्याला परवानगी द्यायची असते. कला संचालनालयात यापूर्वीचे संचालक एकतर शिल्पकलेचे किंवा चित्रकलेचे असायचे. गेली दहा वर्षे कला संचालक असलेले राजीव मिश्रा हे प्रभारी आणि आर्किटेक्ट आहेत. त्यांना पुतळ्याच्या मान्यतेची पद्धत माहित नाही असे नाही. आपल्यावर दोष नको म्हणून त्यांनी प्राथमिक मॉडेलची मंजुरी तेवढी आपण दिली मात्र नंतर भव्य दिव्य आकाराच्या पुतळ्याबद्दल आपल्याकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे माध्यमातून सांगितले आहे. राज्य सरकारने या सगळ्याच प्रकाराची गंभीर दखल घ्यायला पाहिजे होती. नौदलाला घाई होती म्हणून ‘सब कुछ माफ’ असे होऊ शकत नाही. ज्या पुतळ्याला मान्यता दिली त्याची निर्मिती, सौंदर्य, ऐतिहासिक बाजू, वेशभूषा, केशरचना, शस्त्रs या सर्वांचे कठोर निरीक्षण करणे अपेक्षित असते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतीत तरी ते अधिक कठोर आणि काटेकोरपणे केले पाहिजे होते. असे कोणते तज्ञ शिल्पकार होते ज्यांनी या मॉडेलला परवानगी देण्याची शिफारस कला संचालकांना केली आणि कला संचालकांनी त्या पुतळ्याला परवानगी दिली? याचा उल्लेख चौकशी समितीच्या अहवालात आहे का? हे जाहीर झाले पाहिजे. सध्या जितकी माहिती बाहेर आली आहे त्याच्यावरून भव्य आकाराच्या पुतळ्यासाठी त्याचा चबुतराही तसाच दणकट हवा. वजन, घनता लक्षात घेऊन त्याला आवश्यक होते तितके दणकट स्टील वापरले पाहिजे होते. दगड सजावटीसाठी न लावता बुरुजांचे असतात तसे मोठ्या आकाराचे लावण्याची आवश्यकता होती, ते का लावले नाहीत? केवळ दिखाऊपणा करायचा होता का? लोखंडी सांगाडा गंजला असे सांगून किंवा खारे वातावरण आहे असे सांगून यातून अभियंत्याची आणि शिल्पकाराची सुटका होऊ शकत नाही. पण केवळ तेवढेच दोषी आहेत असे मानून त्यांच्यावर कारवाई करून सगळे प्रश्न सुटत नाहीत. इतर आरोपी मात्र सुटतात. जगात आणि भारतातही समुद्राच्या काठावर अनेक पुतळे आहेत. तिथे अशा घटना घडत नाहीत कारण ती शिल्पे शिक्षित शिल्पकाराने बनवलेली असतात. कोणीही आला आणि त्याला कंत्राट दिले असा प्रकार अशा बाबतीत होत नसतो. मालवणमध्ये तो झाला आहे. बहुदा ती चौकशी समितीच्या कार्यकक्षेत नसावी. आदेश काढताना तशी बगल दिलीही असू शकते. शिल्पकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला शिल्पकारच नव्हता, या माहितीची खातरजमा तरी चौकशी समितीने केली का नाही? ते समजत नाही. मात्र शिल्पकार ज्या रहेजा स्कूल ऑफ आर्ट म्हणजे सध्याच्या जे. के. अकॅडमी वडाळा येथून आपण शिल्पकलेचे शिक्षण घेतले असे म्हणतो त्या कला महाविद्यालयात शिल्पकलेचा अभ्यासक्रमच शिकवला जात नाही अशी चर्चा आहे. चौकशी समिती या माहितीपर्यंत पोहोचली की नाही? हे समजायला मार्ग नाही. पण ज्या अर्थी सूत्रांनी ही माहिती सांगितली नाही त्याअर्थी समितीपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली नसावी. मुळात या पुतळ्याचे ओतकाम न होता पत्रे काप करून हा पुतळा बनवण्यात आला. पत्र्याचा वापर केला आहेच तर तो चांगल्या ब्रॉंझचा करून त्याचे जोडकाम तथा शोल्डरिंग दर्जेदार झाले असते तरी शिल्पकाराच्या बाजूने काही बोलता आले असते. मात्र इथे सारेच कामचलाऊ किंवा तकलादु काम झाले आहे. त्याचा पायाही भक्कम नसल्याने हा साराच कारभार उघड पडला.