For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सच्ची मैत्री अन् नात्यातला कोरडेपणा

06:44 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सच्ची मैत्री अन् नात्यातला कोरडेपणा
Advertisement

दुर्लभं प्राकृतं मित्रं दुर्लभ: क्षेमकृत् सुत:।

Advertisement

दुर्लभा सदृशी भार्या दुर्लभ: स्वजन: प्रिय:।।

अर्थ-स्वाभाविक खरा मित्र, हितकारक असा पुत्र, अनुकूल अशी पत्नी आणि प्रिय असे कुटुंब मिळणे दुर्लभ आहे. कृष्णाच्या कथा ऐकताना सुदाम्याची गोष्ट सुरू झाली की आपल्याला सुदाम्यासारखा मित्र असावा असं मनोमन वाटायला लागतं. आपल्या श्रीमंत मित्राचे कोणते फायदे न घेता स्वत:च्या गरिबीत आनंद मानणारा कृष्णाची चूक कधीही उघड न करणारा आणि त्याला मनोमन जपणारा सुदामा आपल्याला आवडतो. तसाच गोकुळातला त्याचा मित्रपरिवारही आपल्याला खूप आवडतो. असे मित्र मिळणं फार अवघड. एकदा दोन मित्र प्रवासाला निघतात. प्रवासामध्ये काही अडचण आल्यानंतर दोघांच्यात बेबनाव होतो. एक मित्र दुसऱ्या मित्राच्या श्रीमुखात भडकवतो. ज्याला थप्पड लागते तो वाळूवरती अन् दगडावरती काहीतरी लिहून ठेवतो. दोघेही जातात. नंतर काही दिवसांनी त्या दोघांनाही चूक उमगल्यानंतर ते त्याच ठिकाणी पुन्हा भेटतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की वाळूवर लिहिलेलं केव्हाच मिटलं गेलंय परंतु दगडावर लिहिलेलं मात्र कायम राहिलेय. वाळूवरती मित्राने मारल्याबद्दल, तर दगडावर, ‘हाच माझा खरा मित्र आहे’ असं लिहिलेलं होतं. म्हणून विसरण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या कधीच कायमस्वरूपी मनात रेखायच्या नसतात. असे मित्र आपल्याला आयुष्यात मिळणं खूप कठीण असतं. कारण बरेचदा मित्र हे काहीतरी फायद्याच्या निमित्ताने काहीतरी मिळेल अशा आशेने जवळ आलेले असतात. मग ते त्यासाठी मित्राला चुकीच्यावेळी सावध करत नाहीत किंवा खोटं बोलून हरभऱ्याच्या झाडावर देखील चढवतात. म्हणून या ओळी फार महत्त्वाच्या.

Advertisement

दुसरी ओळ ही हितकारक पुत्राबाबत आहे. असे पुत्र पुराण काळामध्ये अनेक राजांच्या पोटी जन्माला आले. परंतु अहितकारिपुत्र देखील जन्माला आलेले होतेच. आई-वडिलांचा कुटुंबाचा नाश व्हावा, वंश मिटावा किंवा त्यांची दुष्कीर्ती व्हावी यासाठी वाईट वागणारे पुत्र हे पुढे धुळीला मिळालेच. आई-वडिलांचा संसार नीट चालावा, त्यासाठी आपण त्यांना कुठलाही दोष न देता त्यांच्या गरिबीला आपले चार पैसे जोडता येतील असे पुत्र फार कमी असतात. उलट चांगलं शिकून मोठा केलेला मुलगा देखील आई-वडिलांना ओळखही देत नाही किंवा त्यांचा सांभाळही करत नाही, हेच चित्र आजकाल आपल्याला सर्वत्र दिसतं. अशावेळी सुभाषितातल्या या ओळी आपल्याला नेमक्या आठवतात. अनुकूल पत्नी आजकाल लग्न ठरताना नेमकी कोणती अनुकूलता बघितली जाते हेच लक्षात येत नाही. मुलीला भरपूर पगार हवा. मुलीवर जबाबदाऱ्या कमीत कमी असाव्यात, मुलीला आवडीनिवडी कमी असाव्यात, तिचा खर्च कमी असावा अशा प्रकारची बहुदुधी आणि आखूडशिंगी अशीच पत्नी बघण्याचा कार्यक्रम सर्वत्र चालू असतो. परंतु ती सर्व कुटुंबाचा सांभाळ करेल, सगळ्यांशी मिळूनमिसळून वागेल, सगळ्यांशी जुळवून घेईल असा काही विचार कुठे व्यक्त होताना दिसत नाही. म्हणून पतीच्या विचारांशी एकरूप असणारी पत्नी कुटुंबाला हातभार लावणारी मुला बाळांचा सांभाळ करणारी योग्य पत्नी आजकाल मिळणं दुर्लभ झालेलं आहे. अशी सगळी नाती एकत्र असलेलं कुटुंब आजकाल संपत चाललेलं आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असलेली माणसं दु:खात होती का असा विचार जर केला तर नाही असंच उत्तर मिळतं पण तरीही कुटुंबाची जबाबदारी नको आई-वडील वृद्धाश्रमात असावेत, मुलं हॉस्टेलमध्ये असावीत, वडील कामाच्या गावी असावेत आणि आईने आईचं काम किंवा नोकरी करावी अशा प्रकारचे पैशाच्या मागे धावणारे विचार सर्वत्र कुटुंबांमधून दिसून येतात. अशाप्रसंगी कुटुंबातल्या प्रत्येकाने एकमेकांची काळजी घेऊन एकत्रितरित्या राहून समाजाला आणि देशाला हातभार लावावा. त्या कुटुंबाला प्रिय कुटुंब म्हटलं जातं परंतु अशी कुटुंबं दुर्लभ होत चाललेली आहेत कारण आम्हा सगळ्यांना नात्यांपेक्षाही इतर माणसं, इतर गोष्टी, मोठेपणा मानसन्मान हे मोठे वाटत असल्यामुळे आम्ही त्याला जास्त प्राधान्य देतो. घरातली दु:खं उघडी करतो किंवा अतिशय अलिप्तपणे वागतो. अशावेळी या सुभाषितात म्हटल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालल्या की काय असंच वाटायला लागतं.

Advertisement
Tags :

.