ट्रुडोंनी घेतली हिंदूंच्या रक्षणाची शपथ
खलिस्तान समर्थक पंतप्रधानांना सुचले शहाणपण
वृत्तसंस्था/ ओटावा
खलिस्तान समर्थकांना बळ पुरविणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे सध्या हिंदू मंदिरांना भेट देत आहेत. कॅनडात सार्वत्रिक निवडणूक नजकी आल्याने ट्रुडो यांनी हिंदू समुदायाच्या लोकांची आठवण येऊ लागली आहे. ट्रुडो यांनी दिवाळीनिमित्त मंदिरात जात दीवे प्रज्ज्वलित केले आहेत. तसेच हिंदू समुदायाच्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर त्यांनी हिंदूंची साथ कधीच सोडणार नसल्याचा दावा केला आहे.
दिवाळी हा अंधकारावरील प्रकाशाच्या विजयाचा सण आहे. आम्हाला आमच्या आयुष्यात प्रकाशाची गरज आहे. आम्ही कॅनडात राहणाऱ्या सर्व हिंदूंच्या रक्षणासाठी प्रतिबद्ध आहोत असा दावा ट्रुडो यांनी केला आहे.
कॅनडात हिंदूंवर वारंवर हल्ले होत असतात. हे हल्ले खलिस्तान समर्थकांकडून केले जातात. अलिकडेच कॅनडातील हिंदू खासदार चंद्रा आर्य यांनी हिंदूंना खलिस्तान समर्थकांकडून धोका असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच त्यांनी कॅनडा सरकारला याप्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली होती.
मागील वर्षी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारच्या यंत्रणांचा हात असल्याचा आरोप पंतप्रधान ट्रुडो यांनी केला होता. तर ट्रुडो सरकारचा हा आरोप निराधार असल्याचा दावा भारत सरकारने केला होता. या घटनेनंतर दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत.
कॅनडाकडून पुन्हा आगळीक
कॅनडाची गुप्तचर यंत्रणा कम्युनिकेशन सिक्युरिटी एस्टेब्लिशमेंटने एका अहवालात भारताला एकप्रकारे शत्रू देशांच्या यादीत सामील केले आहे. सायबर धोके निर्माण करू शकणाऱ्या देशांच्या यादीत कॅनडाने भारताला समाविष्ट केले आहे. पहिल्यांदाच भारताचे नाव या यादीत जोडण्यात आले आहे. या यादीत चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया या देशांची नावे सामील आहेत.