For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोमांस वाहतुकीच्या संशयावरून पेटविला ट्रक

01:00 PM Sep 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोमांस वाहतुकीच्या संशयावरून पेटविला ट्रक
Advertisement

ऐनापूर येथील घटना : तणावाचे वातावरण : 7 जणांना अटक

Advertisement

बेळगाव : गोमांसाची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरून सोमवार दि. 22 रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान ट्रक पेटवून देण्यात आला आहे. यानंतर ट्रक चालक व वाहकाकडील मोबाईल, पैसे, लांबविणे, जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली असल्याने याप्रकरणी कागवाड पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणात एकूण 7 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली. आदेश शिवपुत्र जिरगाळे (वय 24), सुहास शिवाजी लोंढे (23), अनिल बसाप्पा सावळी, सदाशिव मल्लाप्पा कुरूंदवाडे (वय 38) चौघेही रा. ऐनापूर आणि विकास दादा वारे, सुधीर नाबीराज बस्ती दोघेही रा. वाळवा ता. सांगली व साहेबलाल हायतचांद मतवाले रा. कुडची ता. रायबाग अशी दोन्ही प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

कुडचीहून हैदराबादला एका ट्रकमधून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरून सोमवारी रात्री काही जणांनी ऐनापूर गावात ट्रक अडवून चालक व वाहकाला मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यासह त्यांच्याकडील पैसे व मोबाईल हिसकावून घेतला. इतकेच नव्हे तर ट्रकही पेटवून देण्यात आला. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात कांहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच कागवाडचे पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. रात्रीच्या गस्तीवर असणारे पोलीस वाहनदेखींल घटनास्थळी दाखल झाले. जमावाची समजूत काढत ट्रकचालक व वाहकाला पोलिसांनी एका दुकानात बसविले. तात्काळ आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या दोन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली.

Advertisement

ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समल्यानंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी 5 ते 6 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पण घटनास्थळावरील व्हिडीओत या घटनेमागे चौघांचा सहभाग असल्याचे दिसून आल्याने आवेश, सुहास, अनिल, सदाशिव या चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालक विकास वारे यांनी तक्रार दिली आहे. तर गोमांसची वाहतूक केल्याप्रकरणी विकास, सुधीर, साहेबलाल यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील आणखी एकजण फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. ट्रकमधील जनावरांचे मांस तपासण्यासाठी त्याचे नमुने विधीविज्ञान प्रयोग शाळेला पाठविण्यात आले आहेत. कोणीही अशाप्रकारे कायदा हातात घेऊ नये. नैतिक पोलीसगिरी करण्याचा प्रकार करू नये. कोणत्याही प्रकारच्या बेकायदा घडामोडी घडत असल्यास याची माहिती पोलिसांना देण्यात यावी, असे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.