बापानंतर आईच्या मायेलाही लेकरं पोरकी झाली, युवती ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या
या अपघातात घटनास्थळीच दोघींनाही प्राण गमवावे लागले.
कराड : आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील आटके टप्पा येथे बुधवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक आणि स्कुटी यांच्यातील जोरदार धडकेत स्कुटीवरील दोघी युवती ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या. दोघींच्याही डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने घटनास्थळी रक्ताचे थारोळे पसरले होते.
या अपघातात घटनास्थळीच दोघींनाही प्राण गमवावे लागले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, घटनास्थळावर उपस्थित असलेले पोलीस आणि लोकही सुरु झाले. या अपघाताने तालुक्यात शोककळा पसरली आहे. या अपघातात करिश्मा ऊर्फ प्राजक्ता कृष्णत कळसे (वय 26, रा. कळसे चौक, रेठरे खुर्द) आणि पूजा रामचंद्र कुराडे (वय 25, रा. येरवळे, ता. कराड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दोघीही कराडलगतच्या डी. मार्ट येथे कामाला होत्या. नेहमीप्रमाणे आपली ड्युटी पूर्ण करून त्या घरी परतत असताना आटके टप्पा येथे हा अपघात घडला. बुधवारी सायंकाळी त्यांचा एक सहकारी आजारी असल्याने त्या त्याला पाहण्यासाठी वाठारकडे निघाल्या होत्या. साडेपाच वाजण्याच्या सुमारास आटके टप्पा येथील एका वळणावर पाठीमागून आलेला ट्रक व दुचाकी एकमेकाला किरकोळ घासले.
यात दुचाकीवरील पूजा आणि करिष्मा या दोघीही ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली दोघीही चिरडल्या गेल्या. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. हा अपघात नेमका कसा घडला, ट्रक चालकाचा निष्काळजीपणा होता का याचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.
ट्रकवर दगडफेक...
चालक पसारदोन निष्पाप बळी अपघातात गेल्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. जमावाने ट्रकवर संतप्त होत दगडफेक केली. जमावाचा आक्रमकपणा पाहताच ट्रकचालकाने उडी टाकून तेथून पलायन करत कराड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी संतप्त जमावाला शांततेचे आवाहन करत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बराचवेळ मृतांच्या ओळख पटवण्याचे काम सुरू होते. यात स्थानिक युवकांसह पोलीस पाटील यांनी पोलिसांना मदत केली. त्यामुळे योग्य वेळेत मृतांची ओळख पटली. दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
वडील गेले... कष्टकरी आई नियतीने हिसकावली
आटके टप्प्यावर झालेल्या भीषण अपघातात दोघी ठार झाल्या. मृत पूजा कुराडे यांच्या पतींचे नुकतेच निधन झाल्याने त्या दोन मुलांसह माहेरी राहात होत्या. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी त्या मॉलमध्ये नोकरी करत होत्या. चिमुकल्या मुलांच्या मायेचा हात असलेल्या पूजा यांच्या मृत्यूने दोन्ही मुलांचे छत्र हरपले आहे. वडील आणि आई दोघांचाही सहवास कायमचा तुटल्याने या मुलांकडे पाहून अख्खा परिसर सुन्न झाला.