कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्नाटकातील पेच

06:46 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता बाहेरून स्थिर आणि सुरक्षित दिसत असली तरी आतून ती दिवसेंदिवस पोखरत आहे. त्याचा उगम विरोधकांमध्ये नसून थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या महत्त्वाकांक्षेच्या संघर्षात आहे. शिवकुमार यांनी एक्सवर केलेली पोस्ट “वचन पाळणं ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे” ही केवळ तात्त्विक ओळ नव्हे, तर सत्तेच्या सिंहासनावर डोळा असलेल्या महत्त्वाकांक्षी नेत्याचा थेट इशारा आहे. नंतर नाश्त्याला एकत्र येऊन दोघांनी पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य असे म्हटले असले तरी ते तितकेसे खरे मानता येत नाही. कर्नाटकात लोकसभेपासून स्थानिक निवडणुकांपर्यंत यशाचा मार्ग मोकळा करणाऱ्या काँग्रेसला आता आपल्या घरातील संघर्षानेच संकट निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला मिळालेल्या राज्यातील प्रचंड बहुमताला भाजपचा धोका नाही, जनतेचा रोष नाही, तर नेतृत्वातील अविश्वास आणि परस्परांची वाढ न सहन करण्याची मानसिकता हा सर्वात मोठा धोका बनत चालला आहे. कथित ‘अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या सूत्रावर’ काँग्रेसने अधिकृतपणे काही कधी जाहीर केले नाही, पण शिवकुमार यांच्या विधानानुसार असा मौखिक करार झाला होता आणि आता त्याची मुदत समीप येत असल्याने प्रश्न अधिक तीव्र होत आहे. हाय कमांडने वेळ काढण्याची भूमिका घेतल्याने वर वर शांतता दिसत असली तरी पक्षांतर्गत असंतोषाचे तापमान सतत वाढत आहे. सिद्धरामय्यांचा अनुभव, कल्याणकारी योजनांची लोकप्रियता आणि ओबीसी मतदारांवरील पकड हे त्यांना सत्तेत प्रथम स्थानी आणतं. दुसरीकडे संघटना चालवण्याची क्षमता, निधी उभारणीची ताकद, गटबाजी मोडून मजबूत आघाडी उभी करण्याची क्षमता अशा गुणांमुळे शिवकुमार अपरिहार्य ठरतात. त्यामुळे दोघांचे महत्त्व नाकारता येत नाही, परंतु त्यांची एकत्र उपस्थिती सरकारची शक्ती न बनता स्पर्धा व तणावाचा स्रोत बनत आहे. शिवकुमार यांची प्रतिमा ही राजकीय धाडस, कठोर पवित्रा आणि परिस्थिती स्वत:कडे वळविण्याची क्षमता या गुणांनी घडली आहे. गुजरातमधील काँग्रेस आमदारांना बंगळूरूमध्ये सुरक्षित ठेवून घोडेबाजार रोखणे, मुंबईत आमदारांना परत आणण्यासाठी स्वत: पोलिसांच्या अडथळ्यांना सामोरे जाणे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या छाप्यांनंतरही न डगमगणे हे सर्व प्रसंग त्यांच्या प्रतिमेला बळ देणारे ठरले. समर्थक त्यांना “काँग्रेसचे रणनितीज्ञ” मानतात, तर विरोधक “अहंकारी” असे संबोधतात. परंतु दोन्ही मतांच्या मागील सत्य एकच ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटणारे नाहीत. कर्नाटकमध्ये जातआधारित राजकीय गणित महत्त्वाची भूमिका बजावते आणि वोक्कलिगांमध्ये शिवकुमार यांचे प्रचंड प्रभावक्षेत्र असल्याने पक्ष त्यांना नाराज करण्याचा धोका घेण्याच्या स्थितीत नाही. सत्ता संघर्षातील खरी दुविधा अशी की सिद्धरामय्या आणि शिवकुमार एकमेकांना हवे आहेत, पण दोघांना एकमेकांचा उदय सहन होत नाही. सिद्धरामय्यांना वाटतं विजयाचं श्रेय त्यांच्या कल्याणकारी निर्णयांना, ‘गृह लक्ष्मी’ व ‘शक्ती’ सारख्या योजनांना आणि त्यांच्या नेतृत्वाला जातं; तर शिवकुमार यांना खात्री आहे की निवडणुकीतील यश हे त्यांच्या जातीय गणित, संघटना, आर्थिक व्यवस्थापन आणि उमेदवार निवडीच्या धोरणामुळे साध्य झालं. त्यामुळे दोघांमध्ये सौहार्दापेक्षा श्रेयासाठीची स्पर्धा अधिक तीव्र होत चालली आहे. त्यातच एकमेकांमधील अविश्वास वारंवार कॅबिनेट निर्णयात, टेंडर मंजुरीत, जिल्हावार अधिकारवाटपात आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून उघडपणे जाणवतो आहे. कर्नाटक काँग्रेसला आज सर्वाधिक भीती भाजपची नाही, तसेच स्वत:च्या गटबाजीची आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थैर्य गमावण्याचा अनुभव डोळ्यासमोर असल्याने हाय कमांडला भीती वाटत आहे की मुख्यमंत्रीपदाच्या रोटेशनच्या मुद्यावर ओढा-ताण वाढल्यास सरकार अस्थिर होऊ शकते. राज्यातील गुंतागुंतीचे जातीय समीकरण, प्रादेशिक असमतोल आणि स्थानिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा या सगळ्यांचा एकत्र परिणाम होऊ लागला आहे. काँग्रेसमध्ये वाढत असलेली “तुमच्या योजनांमुळे मत मिळाले की आमच्या नेतृत्वामुळे?” ही स्पर्धा प्रशासनापेक्षा प्रतिमेसाठी अधिक लढली जात असल्याचेच दाखवून देते. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वापुढे पुढील सहा महिन्यांत तीनच पर्याय आहेत  हाय कमांड रोटेशन सूत्र लागू करून मुख्यमंत्रीपद शिवकुमार यांच्याकडे हस्तांतरित करेल किंवा सूत्र नाकारेल आणि असंतोष वाढेल; किंवा निर्णय पुढे ढकलून तात्पुरता तणाव शांत ठेवेल. पण या तिन्ही परिस्थितीत संघर्षाची बीजे कायम राहतील, हीच खरी चिंता. सत्ता हस्तांतरणाचा वेळेत निर्णय न दिल्यास सत्तेला जास्त तडे जातील, असा पक्षातील अनुभवी नेत्यांचा इशारा आहे. कर्नाटक काँग्रेससमोरचा गंभीर प्रश्न केवळ “पुढचा मुख्यमंत्री कोण?” हा नाही. प्रश्न अधिक खोल आहे. काँग्रेसला भविष्य जपणारे नेतृत्व हवे आहे की वर्तमान टिकवणारे? दोन्ही नेते जर आपल्या महत्त्वाकांक्षा घट्ट पकडून बसले तर सत्ता टिकवण्यापेक्षा सत्तेतून दूर जाण्याचा धोका जास्त आहे. कारण काँग्रेसच्या इतिहासाने दाखवून दिलं आहे की राज्यातील अंतर्गत मतभेद बाहेरील विरोधकांपेक्षा नेहमीच अधिक घातक ठरले आहेत. आज कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता टिकवण्यासाठी सर्वाधिक जरूरी गोष्ट म्हणजे प्रगल्भ राजकीय शहाणपण. कारण सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील संघर्ष हा केवळ व्यक्तींचा नाही तो काँग्रेसच्या पुढील राजकीय दिशेचा, नेतृत्व-वारसाचा आणि सामाजिक समीकरणांच्या पुनर्रचनेचा मोठा निर्णायक क्षण आहे. एक चूक, एक चुकीचा निर्णय किंवा एका बाजूची अति महत्त्वाकांक्षा पूर्ण राज्यकारभाराला अस्थैर्याच्या मैदानात फेकू शकते. सत्तेवर बसलेल्यांना सत्तेची किंमत कळतेच, पण सत्तेला टिकवण्याची किंमत अधिक कठोर असते. आज काँग्रेससमोरचा खरा परीक्षेचा क्षण तोच आहे. सत्ता मिळवणं सोपं असू शकतं, पण सत्तेला सांभाळण्याची लढाईच खरी कठीण असते. ती अडीच घरांमध्ये लंगडी टाकत पूर्ण करण्यातून हित होणार नाही, ती विश्वास, संयम आणि विवेकाने पूर्ण करण्यातूनच सरकार, पक्ष आणि राज्य यांचा फायदा होऊ शकतो.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article