ट्रीसा-गायत्रीचा महिला दुहेरीचा किताब कायम
वृत्तसंस्था/ लखनौ
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 स्पर्धेत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीने महिला दुहेरीचा किताब कायम ठेवला आहे. पण किदाम्बी श्रीकांतच्या आठ वर्षांच्या जेतेपदाच्या दुष्काळातून बाहेर पडण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. कारण रविवारी येथे झालेल्या अंतिम फेरीत त्याला पराभव पत्करावा लागला.
माजी विजेता व 2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता श्रीकांत 67 मिनिटांच्या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत 59 व्या स्थानावर असलेल्या हाँगकाँगच्या जेसन गुनावानकडून 16-21, 21-8, 20-22 असा पराभूत झाला. या 32 वर्षीय खेळाडूने 2017 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये शेवटचे जेतेपद जिंकले होते आणि या वर्षाच्या सुऊवातीला मलेशिया मास्टर्स सुपर 500 मध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
गतविजेत्या ट्रीसा आणि गायत्री यांनी मात्र आक्रमक कामगिरी करत एका गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही जपानच्या काहो ओसावा आणि माई तानाबे या जागतिक क्रमवारीतील 35 व्या स्थानावरील जोडीचा 17-21, 21-13, 21-15 असा पराभव केला. गायत्री पाच महिने खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर राहून परतल्यानंतरची ही या जोडीची दुसरीच स्पर्धा होती. ही रोमांचक लढत एक तास 16 मिनिटे चालली.
श्रीकांतविरुद्धच्या सामन्यात गुनावानने जोरदार सुऊवात करत आधी 4-1, नंतर 14-10 आणि 17-11 अशी मुसंडी मारली. त्यानंतर श्रीकांतने सातपैकी तीन गेम पॉइंट वाचवले. मात्र गुनावानने एक शक्तिशाली स्मॅश हाणत पहिली गेम आपल्या खात्यात जमा केली. बाजू बदलल्यानंतर श्रीकांतचे पुनरुज्जीवन झाले आणि त्याने आक्रमणात वेग आणत, जबरदस्त स्मॅश तसेच परतीचे फटके हाणत दुसरा सेट जिंकून सामन्यात पुनरागमन केले. निर्णायक सामन्यात दोन्ही बाजूंनी पारडे झुकत राहून एक वेळ 17-17, 19-19 व 20-20 अशी बरोबरीची स्थिती झाली होती. पण त्यानंतर गुनावानने हा गेम जिंकण्यात यश मिळविले.
महिला दुहेरीच्या अंतिम फेरीची सुऊवात 49 फटक्यांच्या रॅलीने झाली, त्यातून ही लढत चुरसपूर्ण होणार असल्याची चिन्हे स्पष्ट झाली. दोन्ही जोड्यांनी जोरदार लढत दिली. परंतु ओसावा आणि तानाबे यांनी पहिला गेम मिळविला. खचून न जाता बाजू बदलल्यानंतर ट्रीसा आणि गायत्रीने रॅलीवर नियंत्रण मिळवत 17-9 आणि पुढे 20-11 अशी आघाडी मिळविली आणि तीच गती कायम राखत गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने सुरुवातीला 7-4 अशी आघाडी घेतली. पण समन्वयातील चुकांमुळे त्यांना काही गुण गमवावे लागले. मात्र लगेच नियंत्रण मिळवत त्यांनी तिसरा गेम आपल्या बाजूने वळविला.