तवंदी घाटात तिहेरी अपघात, एक ठार
दोघे गंभीर : मृत उत्तरप्रदेश येथील : क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना
वार्ताहर/ तवंदी
निपाणीनजीकच्या तवंदी घाटात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या तिहेरी अपघातात एक जण जागीच ठार तर दोघेजण गंभीर झाल्याची घटना घडली. संतोषकुमार यादव (वय 32, रा. उत्तर प्रदेश) असे ठार झालेल्याचे नाव आहे. अनिकेत कुमार (वय 24, रा. उत्तरप्रदेश) व सुकवेंद्र (वय 24, रा. पंजाब) अशी गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अपघातानंतर घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
क्रेन बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान डंपर व कंटेनर देखील जात होते. क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने डंपर व कंटेनर असा तिहेरी अपघात झाला. यात क्रेन चालक संतोष कुमार यादव हा ठार झाला तर क्रेनमधील सुकवेंद्र व कंटेनर चालक अनिकेत कुमार हे दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे कर्मचारी संतराम माळगी, अवताडे कंपनीचे उच्च अधिकारी विजय दाइं&गडे, निपाणीचे सीपीआय बी. एस. तळवार, निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी गौडा, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार तसेच साहाय्यक उपनिरीक्षक सूर्यवंशी, हवालदार मंजुनाथ कल्याणी, यासीन कलावंत, अमर चंदनशिव यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली.
या विचित्र तिहेरी अपघातामुळे वाहनांचे सुमारे 20 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले. सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. सुमारे एक किलोमीटर इतक्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे तासाभरानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली. गंभीर जखमींना त्वरित रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालय निपाणी येथे आणण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे.