भीषण अपघातात सौंदत्तीचे तिघे ठार
अळणावरजवळ मालवाहू टेम्पो-प्रवासी वाहनाची समोरासमोर धडक : 16 जण जखमी
बेळगाव : मालवाहू 407 टेम्पो आणि प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सौंदत्ती तालुक्यातील तिघेजण जागीच ठार तर 16 जण जखमी झाले. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अळणावर-धारवाड राष्ट्रीय महामार्गावरील कडबगट्टी गावापासून एक किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला आहे. अपघाताची नोंद अळणावर पोलीस ठाण्यात झाली आहे. हनुमंत सिद्धाप्पा मल्लाड (वय 45), महांतेश हनुमंत चव्हाण (वय 44), महादेवप्पा बसप्पा हल्लोळी (वय 38, सर्व जण राहणार कल्लापूर, ता. सौंदत्ती) अशी मयतांची नावे आहेत. तर प्रकाश सोरय्या, यशवंतकुमार, शशीकुमार, अनुपकुमार, अनंतराज, सुनील एम. सी., सुनील एन., संदीप, शशांक, किरण, संदीप, आकाश, श्रीकांत, रक्षा (सर्वजण राहणार मॅसरट्टी, पोस्ट मुद्दापूर, ता. जि. चित्रदुर्ग) आणि प्रकाश निंगाप्पा जलाई (रा. कल्लापूर, ता. सौंदत्ती) अशी जखमींची नावे आहेत.
कल्लापूर, ता. सौंदत्ती येथील चौघेजण टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनातून कडबा भरलेली पोती घेऊन सौंदत्तीहून गोव्याकडे निघाले होते. अळणावर-धारवाड राष्ट्रीय महामार्गावरील कडबगट्टी गावापासून एक किलोमीटर अंतरावर आले असताना चालक प्रकाश जलाई याचा भरधाव वाहनावरील ताबा सुटला. वळणावर टेम्पो पलटी होणार इतक्यात गोव्याहून चित्रदुर्गकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला समोरून धडक दिली. यावेळी दोन्ही वाहनांची भीषण धडक झाल्याने मालवाहू वाहनातील तिघेजण जागीच ठार झाले. तर चालक प्रकाश गंभीर जखमी झाला. त्याचबरोबर एकूण सोळाजण जखमी झाले. यापैकी तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चित्रदुर्ग येथील पंधराजण पर्यटनासाठी गोव्याला गेले होते. ट्रिप आटोपून चित्रदुर्गला जाण्यासाठी निघाले असताना हा अपघात घडला. अपघाताची माहिती समजताच धारवाडचे जिल्हा पोलीसप्रमुख गोपाळ ब्याकुड, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख नारायण बरमणी, धारवाड ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी यांनी भेट देऊन पाहणी केली. अळणावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना देऊन त्यांना पाचारण करण्यात आले. शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी मालवाहू टेम्पोचालक प्रकाश जलाई याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अन् कुली कामगारांचा गेला हकनाक बळी
प्रकाश जलाई चालवत असलेल्या वाहनातून मक्याचा कडबा घेऊन हनुमंत, महांतेश व देवाप्पा हे तिघेजण कुली कामगार गोव्याला जात होते. गोव्याला कडबा खाली करून ते पुन्हा गावाकडे परतणार होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.