प्रवाशांचे दागिने पळविणाऱ्या त्रिकुटाला अटक
महिलेचा समावेश, मार्केट पोलिसांची कारवाई, 7 लाखांचे दागिने जप्त
बेळगाव : बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील दागिने चोरणाऱ्या त्रिकुटाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. पावणेदोन वर्षांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीस दलाला यश आले असून 7 लाख रुपये किमतीचे 100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी गुरुवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक एच. एल. केरुर, लक्ष्मण कडोलकर, शिवाप्पा तेली, आय. एस. पाटील, शंकर कुगटोळी, सुरेश कांबळे, कार्तिक एम. जी., अनिता हंचनाळ आदींनी ही कारवाई केली आहे.
दि. 30 डिसेंबर 2022 रोजी मध्यवर्ती बसस्थानकावर मीनाक्षी गोपाल कृशकन्नवर (मूळच्या रा. हारुगेरी ता. रायबाग, सध्या रा. शिवशक्ती कॉलनी, रामतीर्थनगर) या महिलेच्या बॅगमधील 100 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. त्याचदिवशी यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. रिझवाना सिराज पठाण (वय 40, रा. विद्यानगर बॉक्साईट रोड) या महिलेसह मलिकजान दस्तगीरसाब शेख (रा. गोकाक), विनायक अरुण हिंडलगेकर (वय 32, मूळचा रा. चव्हाट गल्ली, सध्या रा. जुने गांधीनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 20 ग्रॅमची चेन, 40 ग्रॅमच्या बांगड्या, 40 ग्रॅमचे मंगळसूत्र असे एकूण 100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.