त्रिकुटाला अटक करून 55 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
यमकनमर्डी पोलिसांची कारवाई : महिलेच्या बॅगमधील दागिने पळविल्या प्रकरणाचाही छडा
प्रतिनिधी/ बेळगाव
यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या चोरी प्रकरणी दादबानहट्टी येथील त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे. यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 55 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगमधील दागिने पळविल्या प्रकरणाचाही छडा लावण्यात आला आहे. तर इस्लामपूर येथील एका चोरी प्रकरणाचा तपास लावण्यात आला आहे. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिघा जणांच्या मुसक्या आवळून चोरी प्रकरणातील दागिने जप्त केले आहेत.
लक्ष्मीकांत कृष्णप्पा बेडरहट्टी (वय 19) मूळचा रा. बेडरहट्टी, सध्या रा. दादबानहट्टी, इराण्णा रवी नाईक (वय 22) मूळचा रा. उळ्ळाग•ाr खानापूर, सध्या रा. दादबानहट्टी, संजय सुरेश गडदक्की (वय 22) रा. दादबानहट्टी अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी या त्रिकुटाला अटक करून या दोन्ही प्रकरणात चोरीस गेलेले 55 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार इस्लामपूर येथील अडव्याप्पा लगमाप्पा बागराई यांच्या घरात चोरी झाली होती. दि. 28 ऑक्टोबरच्या सकाळी 6.30 वाजता ही घटना उघडकीस आली होती. चोरट्यांनी 30 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले होते. दुसरी घटना 19 ऑगस्ट रोजी घडली होती. सविता बसवराज नगारी, रा. यमकनमर्डी या महिलेच्या बॅगमधील 25 ग्रॅमचे दागिने पळविण्यात आले होते. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास लावला आहे.