घरकुल प्रदशर्नला तुफान प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
गृहबांधणीतील नावीन्यपूर्ण साहित्य उपलब्ध असणारे ‘तरुण भारत’ पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल असोसिएशन आयोजित घरकुल प्रदर्शनाला शनिवारी तुफान प्रतिसाद मिळाला. गृहनिर्माण क्षेत्रातील नवीन साहित्य व त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी स्टॉलवर झुंबड उडाली होती. यामुळे स्टॉलधारकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.
बेळगावच्या सीपीएड मैदानावर घरकुल 2024 प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दि. 26 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू असणार आहे. शनिवारी सरकारी कार्यालयांना सुटी असल्यामुळे सायंकाळपासून प्रदर्शनाला गर्दी होती. मॉड्युलर डोअर व वूड, सॅनिटरी फिटींग, अॅटोमेशन, वॉटर प्युरिफायर, रियल इस्टेट फायनान्स, आर्किटेक्चर, इलेक्ट्रिकल, लायटिंग, सिमेंट, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, बिल्डिंग मटेरियल, प्लायवूड, हार्डवेअर, टाईल्स यासह इतर साहित्य प्रदर्शनामध्ये एकाच ठिकाणी पाहता येत आहे. बेळगाव परिसरात गृहनिर्माण क्षेत्राविषयी भरविले जाणारे हे भव्य प्रदर्शन असल्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
फॅशन शो, डान्सद्वारे मनोरंजन
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे शनिवारी फॅशन शो तसेच डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डान्स स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. बेळगाव परिसरातील कलाकारांनी एकापेक्षाएक सरस नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. शिव एरोलकर या चार वर्षाच्या चिमुकल्याने सादर केलेल्या तानाजी चित्रपटातील नृत्याने उपस्थितांची वाहव्वा मिळविली. याचबरोबर विविध संघांनी ग्रुप डान्स सादर केला. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत नागरिकांनी डान्स स्पर्धेचा आनंद घेतला.
हास्यसम्राट दीपक देशपांडे आज बेळगावात
महाराष्ट्राचे हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ’ हा विनोदी कार्यक्रम रविवार दि. 24 रोजी घरकुल प्रदर्शनात होणार आहे. सायंकाळी 5 वाजता सीपीएड मैदानावरील व्यासपीठावर हा कार्यक्रम होईल. झी मराठीवरील हास्यसम्राट या कार्यक्रमातून देशपांडे यांनी रसिकांना खळखळून हसवले आहे. अनेक राजकीय व्यक्तींचा हुबेहूब आवाज काढणे, सोलापुरी भाषेचा गोडवा त्यांनी आपल्या कार्यक्रमातून पोहोचविला आहे. त्याचबरोबर सायंकाळी 7 वाजता हार्मनी ऑर्केस्ट्रा हा सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे पोतदार ब्रदर्स ज्वेलर्स, बीएससी टेक्स्टाईल मॉल, अॅप्टेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अॅकॅडमी व अणवेकर गोल्ड हे प्रायोजक आहेत.