For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एसआयआर’विरोधात तृणमूलचे आंदोलन

06:30 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘एसआयआर’विरोधात तृणमूलचे आंदोलन
Advertisement

भाजपसह निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जींचा हल्लाबोल : पक्षपातीपणाचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. बोनगाव येथील एका एसआयआरविरोधी रॅलीत त्यांनी निवडणूक आयोग एक निष्पक्ष संस्था राहणे सोडून ‘भाजप आयोग’ बनल्याचा आरोप केला. एसआयआर प्रक्रियेवर नाराज असलेल्या ममतांनी भाजपला उघड इशारा देत आता संपूर्ण देशात पक्षाचा पाया हादरवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून अलिकडच्या निवडणुकीशी संबंधित दोन निर्देशांवर त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

बोनगाव येथील सभेत ममता बॅनर्जी यांनी एसआयआर प्रक्रियेवर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, एसआयआरनंतर मसुदा मतदारयादी प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक आयोग आणि भाजपने निर्माण केलेल्या ‘आपत्ती’ची जाणीव लोकांना होईल. भाजप आमच्याशी राजकीयदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाही किंवा पराभूत करू शकत नाही, असा दावा करत जर भाजपने बंगालमध्ये मला दुखावण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण भारतात त्यांच्या पक्षाचा पाया खिळखिळा करून सोडणार असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या. दरम्यान, भाजपनेही ममता बॅनर्जींच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. एसआयआर संपूर्ण भारतात आयोजित केला जाणार आहे. सध्या 12 राज्यांमध्ये हे काम सुरू आहे. पण ममता बंगालमध्ये इतका आवाज का करत आहेत? कारण ममता सध्याच्या मतदारयादीच्या आधारे निवडणुका घेऊ इच्छितात, जे आता अशक्य आहे, असे बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य म्हणाले.

बिहार निवडणुकीचा निकाल हा एसआयआरचा परिणाम आहे आणि विरोधकांना भाजपच्या हालचालींचा अंदाज घेता आला नाही. जर एसआयआर दोन ते तीन वर्षांत झाला तर त्यांचे सरकार सर्व शक्य साधनांसह प्रक्रियेला पाठिंबा देईल, असा पुनरुच्चार ममता बॅनर्जी यांनी केला.

Advertisement
Tags :

.