तृणमूल खासदाराचा सीबीआयवर निशाणा
आरजी कर प्रकरणात तपासात दिरंगाईचा आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी कोलकाता येथील आरजी कर सरकारी ऊग्णालयात घडलेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी सीबीआयवर निशाणा साधला. याप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्यास होत असलेल्या विलंबावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत ओब्रायन यांनी जलद न्यायाची मागणी केली.
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये एका ज्युनियर डॉक्टरसोबत क्रूरतेची घटना 9 ऑगस्ट रोजी घडली होती. मृत महिला प्र्रशिक्षणार्थी डॉक्टर होती. तिच्या बाबतीत बलात्कार व हत्येचा प्रकार उघड झाल्यापासून पश्चिम बंगालमधील वातावरण तप्त असतानाच आता तृणमूल नेते डेरेक ओब्रायन यांनी तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घटनेला महिना उलटला असला तरी तपासात म्हणावी तशी गती येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.