तृणमूल नेते अनुव्रत मंडल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने पशूतस्करीप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते अनुव्रत मंडल यांना मंगळवारी जामीन मंजूर केला. न्यायाधीश बेला त्रिवेदी आणि एस.सी. शर्मा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणीस वेळ लागणार असल्याच्या आणि दोन वर्षांपासून तुरुंगात असल्याच्या मंडल यांच्या युक्तिवादाच्या आधारावर दिलासा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंडल यांना तपासात सहकार्य करणे आणि पासपोर्ट जमा करण्याचा निर्देश दिला आहे. याप्रकरणी चार आरोपपत्रं दाखल करण्यात आली असून तृणमूल नेते मंडल वगळता उर्वरित सर्व आरोपी तुरुंगाबाहेर असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वतीने वकील मुकुल रोहतगी यांनी केला.
तर सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी जामीन याचिकेला विरोध केला. मंडल अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असून ते पुराव्यांसोबत छेडछाड करण्याच्या कृत्यात सामील होते असा दावा त्यांनी केला. मंडल हे पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्dयातून बांगलादेशात होणाऱ्या पशूतस्करीचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे.