तीन वृत्तवाहिन्यांवर तृणमूलचा बहिष्कार
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसने तीन वृत्तवाहिन्यांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहिन्या ‘दिल्लीतील जमीनदारां’ची खुषमस्करी करीत आहेत. तृणमूलच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप करुन या पक्षाने हा बहिष्काराचा निर्णय घोषित केला.
एबीपी आनंद, रिपब्लिक टीव्ही आणि टीव्ही 9 अशी या वाहिन्यांची नावे आहेत. या वाहिन्यांचे प्रवर्तक आणि कंपन्या यांच्यावर केंद्र सरकारच्या चौकशी प्राधिकरणांनी कारवाई चालविलेली असल्याने या कारवाईपासून सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्य सरकारच्या विरोधात आणि एकंदरच या राज्याची बदनामी करण्यासाठी अभियान चालविले असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. या वाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी यापुढे तृणमूल काँग्रेसकडून आपले प्रतिनिधी पाठविले जाणार नाहीत. पश्चिम बंगालच्या जनतेने या वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहून स्वत:ची दिशाभूल करुन घेऊ नये, असे आवाहनही या पक्षाने केले. एबीपी आनंद ही वाहिनी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या वाहिनीवरील वृत्तांचा आणि कार्यक्रमांचा पश्चिम बंगालमधील जनतेवर मोठा प्रभाव असल्याचीही चर्चा आहे.
भाजपकडून खिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या या बहिष्काराची खिल्ली भारतीय जनता पक्षाने उडविली आहे. ‘हीच का तुमची लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील श्रद्धा’ असा खोचक प्रश्न भारतीय जनता पक्षाने विचारला आहे. तृणमूल काँग्रेस हा पक्ष प्रारंभापासूनच हुकुमशाही प्रवृत्तीचा असल्याने त्याला किंचितही विरोध सहन होत नाही. भारतीय जनता पक्षाला लोकशाहीवरुन व्याख्याने देणाऱ्या या पक्षाचे स्वरुप या बहिष्काराच्या निर्णयामुळे लोकांसमोर उघडे पडले आहे. लोक या पक्षाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीकाही भारतीय जनता पक्षाने केली.
कार्यक्रमावरुन वाद
एका बंगाली भाषिक वृत्तवहिनीच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या चर्चात्मक कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी कोलकता बलात्कार आणि हत्या घटनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसंबंधी अवमानास्पद भाषा केली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी संघटनांनी त्यांचा तीव्र निषेध केला होता. नंतर घोष यांनी यासंबंधी क्षमायाचनाही केली होती. तथापि, या वृत्तवाहिनीवरुन त्यांच्यावर जोरदार टीका झाल्याने तृणमूलने बहिष्काराचा निर्णय घेतला, अशी माहिती या पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे.