एक लाख घरांवर स्वातंत्र्यदिनी फडकणार तिरंगा
‘तिरंगा बाईक’ रॅली, ’विभाजन स्मृतिदिन’ कार्यक्रमांचेही आयोजन
प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक भारतीयाने घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन केले होते. त्याला अनुसरून गोव्यातही 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ फडकविण्यात येणार आहे. त्यानुसार किमान 1 लाख घरांवर तिरंगा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी दिली.
पणजीत भाजप मुख्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी राज्य सचिव दयानंद सोपटे आणि सर्वानंद भगत यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्यदिन हा अत्यंत देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असून घरोघरी तिरंगा वितरणही करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
त्याशिवाय अन्य विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून आजपासून राज्यभरात तिरंगा बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. आपल्या देशाला 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले तर 14 ऑगस्ट रोजी देशाची फाळणी करण्यात आली. त्या दिवसाच्या स्मृती आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दि. 14 रोजी ‘विभाजन स्मृतिदिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, उत्तरेत म्हापसा येथे तर दक्षिण गोव्यात मडगाव येथे हे कार्यक्रम होतील, अशी माहिती सावईकर यांनी दिली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येकाने आपल्या व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवरील प्रोफाईल फोटो म्हणून तिरंगा ठेवावा, त्यातल्या त्यात लहान मुलांच्या हस्ते फडकवावा, व तोच फोटो प्रोफाईल म्हणून ठेवावा, असे आवाहन सावईकर यांनी केले.