कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

थॉमस कपवर तिरंगा

06:55 AM May 17, 2022 IST | Tarun Bharat Portal
S
Advertisement

बॅडमिंटनच्या जगतातील सर्वात प्रतिष्ठाची समजली जाणारी थॉमस कप स्पर्धा भारताने जिंकली. थॉमस कपवर 73 वर्षांनी तिरंगा फडकला. सर्व भारतीयांना 75 वर्षांपूर्वी युनियन जॅक उतरवून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला होता, तसाच आनंद झाला आहे. देशातील सध्याचे घुसळणीचे सुरू असलेले वातावरण लक्षात घेता, त्या घुसमटून टाकणाऱया वातावरणात थॉमस करंडक स्पर्धेतील विजेतेपद हे आनंददायी आहे. तब्बल 14 वेळा विजेतेपद पटकावण्याचा अनुभव असलेल्या इंडोनेशियावर सरळ 3-0 असा दणदणीत विजय मिळवून पटकावलेले विजेतेपद भारतीयांचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. 1983 साली भारताने पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक पटकावला होता. तोही त्यावेळच्या सर्वात बलाढ्य समजला जाणाऱया आणि विश्व विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधू पाहणाऱया वेस्टइंडीजला नमवून. तेव्हापासून क्रीडा क्षेत्रात भारतीयांची दमदार वाटचाल सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपणही जिंकू शकतो याचा आत्मविश्वास या विजयाने दिला होता. 83चे क्रिकेटचे विजेतेपद मिळवण्या आधीच दोन वर्ष बॅडमिंटनमध्येच प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर पुढच्याच वषी त्यांनी या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. तर 1983 सालच्या जागतिक अजिंक्मयपद स्पर्धेत पदुकोण यांनी कास्यपदक मिळवले होते. बॅडमिंटनमधील ही सुवर्णमयी वाटचाल पुढे वीस वर्ष खंडित झाली होती. मात्र 2001 मध्ये पुलेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून इतिहास घडवला. त्यानंतर गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात फुल-बॅट समजल्या जाणाऱया खेळात भारतीयांचा दबदबा दिसू लागला आहे. पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेत आपला ठसा उमटवला. तर बी. साईप्रणित, किदांबी श्रीकांत, लक्ष सेन यांनी जागतिक अजिंक्मयपद स्पर्धेत चीन, मलेशिया, इंडोनेशिया यांच्या जागतिक खेळाडूंना पराभूत करून आपला ठसा उमटवला. तसेही क्रिकेट वगळता भारताचा असा कुठलाही हुकमी खेळ राहिलेला नाही. कधीकाळी हॉकी हा आपला हुकमी खेळ होता. पण त्यातही गेल्या काही वर्षात सातत्याने पीछेहाट सुरू आहे. जपानमध्ये गतवषी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पदक पटकावले हीच आपली मोठी कमाई आहे. ऑलिम्पिक मध्येही गतवषी भारताने पहिल्यांदाच दमदार कामगिरी केली होती. नीरज चोप्राच्या सुवर्णपदकासह दोन रौप्य आणि चार कांस्य अशी अवघी सात पदके असली तरी भारताच्या इतिहासातील ही सर्वाधिक कमाई होती. जगातील जवळपास सर्वच विकसित देश क्रीडा क्षेत्रातही आपले वर्चस्व राखून आहेत. परंतु 130 कोटी लोकसंख्येच्या भारतात क्रीडा क्षेत्राला दुय्यम दर्जा दिला जात आहे. त्यामुळेच आपल्याकडे क्षमता असूनही खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक पाठिंबा मिळत नाही. तरीही भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण करत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी छोटय़ाशा पराभवाने खचून जाणारे भारतीय खेळाडू आता मानसिकदृष्टय़ा कणखर होत असल्याचे विविध स्पर्धेतून दिसून येत आहे. गतवषी ऑस्ट्रेलिया दौऱयात भारतीय क्रिकेट संघ पहिल्या कसोटीत दारुण पराभूत झाला होता. मात्र त्यानंतर पिछाडीहून येत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्याची कामगिरी पहिल्यांदाच केली. त्याचाच आदर्श थॉमस करंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी घेतला. या स्पर्धेच्या निकालाकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की, बाद फेरीत भारताने मलेशिया, डेन्मार्क या बलाढ्य संघांचे अडथळे पार केले होते. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास अगदी ‘सातवे आसमान पर’ होता. अंतिम सामना जिंकणारच हा आत्मविश्वास बाद फेरीत मिळाल्यामुळे 14 वेळच्या विजेतेपदाचा अनुभव पाठीशी असणारा इंडोनेशियाचा संघ ढेपाळला. 1983 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हेच घडले होते. त्यावेळी कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज यांचा साखळी आणि बाद फेरीत पराभव केला होता. त्यामुळे कपिल देवच्या संघाचा आत्मविश्वास अंतिम सामन्यावेळी टिपेला गेला होता. त्याची परिणती बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ भारतासमोर ढेपाळला. त्याची पुनरावृत्ती थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेत दिसून आली. अंतिम सामन्यात एकेरीच्या पहिल्या लढतीत लक्ष्य सेनने पहिला गेम एकतर्फी गमावला होता. तरीही त्याची मनोवृत्ती पराभूत झाली नाही. त्यामुळेच दुसरा आणि तिसरा गेम जिंकून त्याने विजयी सुरुवात करून दिली. दुहेरीच्या सामन्यात सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनीही पहिला गेम गमावला होता. तरी त्यांनी आपले मनोबल कायम ठेवत दुसरा आणि तिसरा गेम जिंकून भारताला 2-0 आघाडी मिळवून दिली. या ठिकाणी ‘माईंड गेम’चा प्रभाव तिसऱया सामन्यात दिसून आला. पहिल्या दोन सामन्यात पहिले गेम जिंकूनही पराभव पत्करल्यामुळे इंडोनेशियाचे मनोबल खचल्याचे तिसऱया सामन्यात दिसून आले तर भारताच्या किदांबी श्रीकांतचे मनोबल वाढले होते. त्यामुळे त्याने हा सामना अवघ्या 48 मिनिटात सलग दोन गेममध्येच जिंकला आणि भारताच्या पहिल्यावहिल्या थॉमस चषकावर विजेतेपद कोरले. थॉमस चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर तिरंगा ध्वज वर जाताना खेळाडूंचे डोळे भरुन आले होते. त्यांची छाती अभिमानाने फुलली होती. 1996 मध्ये अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत लिअँडर पेसने भारताला लॉन टेनिसमध्ये कास्य पदक मिळवून दिले होते. त्यावेळी तिरंगा ध्वज वर जाताना माझी छाती अभिमानाने फुलली होती असे पेस म्हणाला होता. देशासाठी जागतिक स्पर्धेत यश मिळवल्यानंतर तिरंगा ध्वज फडकताना होणारा आनंद आणि अभिमान ही समस्त भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज देशात सुरू असलेल्या घुसमटीच्या वातावरणात हा अभिमान पुन्हा एकदा भारतीयांना समाधानाचा श्वास घेऊ देईल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article