माजी आमदार काका पाटील यांना विधानसभेत श्रद्धांजली
बेंगळूर : सोमवारपासून बेंगळुरात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला. अलीकडेच निधन झालेल्या आमदार काका पाटील यांच्यासह विविध मान्यवरांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी मंत्री बेगाने रामय्या, निपाणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काका पाटील, एन. राजण्णा, डेरिक एम. बी, विधानपरिषदेचे माजी सभापती डॉ. एन. तिप्पण्णा, माजी उपसभापती डेव्हिड सिमोन, राज्यसभेचे माजी सदस्य आणि इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन, प्रसिद्ध कृषीतज्ञ प्रा. सुब्बण्णा अय्यप्पन, अणुशास्त्रज्ञ एम. आर. श्रीनिवासन, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जी. एस. सिद्धलिंगय्या, ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजादेवी, ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे अलीकडे निधन झाल्याचे विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेले व्यक्ती, आरसीबीच्या विजयोत्सवावेळी चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांना तसेच गुजरातमध्ये एअर इंडिया विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासंबंधीचा शोकप्रस्ताव मांडला. त्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह अनेकांनी दिवंगत मान्यवरांच्या कार्याचे स्मरण केले. त्यानंतर सभागृहात मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.