For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडाच्या संसदेत निज्जरला श्रद्धांजली

06:26 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅनडाच्या संसदेत निज्जरला श्रद्धांजली
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याला कॅनडाच्या संसदेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. मंगळवारी कॅनडाच्या संसदीय अधिवेशनात हा कार्यक्रम झाला. या देशाच्या लोकप्रतिनिधींनी त्याला एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली दिली. निज्जर याची एक वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती.

मूळचा भारतातील पंजाबचा असणारा निज्जर कॅनडाचा नागरिक होता. तो खलिस्तानवादी दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता. भारताने त्याच्याविरोधात नोटीस काढलेली होती. मात्र, कॅनडा सरकारने कोणतीही कारवाई केली नव्हती. निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेचा चालक होता. 18 जून 2023 या दिवशी कॅनडातील सरे प्रांतातील ब्रिटीश कोलंबिया येथील गुरुद्वारासमोर निज्जर याची हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी कॅनडाने करण ब्रार, अमनदीप सिंग, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग या चार भारतीय वंशाच्या नागरिकांना अटक केली आहे. निज्जर याच्या हत्येत भारताचा हात आहे, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केला होता. मात्र, आजवर यासंबंधीचे कोणतेही पुरावे देण्यात आलेले नाहीत. ट्रूडो यांच्या आरोपामुळे भारत आणि कॅनडा यांच्या संबंधांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. निज्जर हा बनावट पासपोर्टच्या आधारावर कॅनडामध्ये गेला होता, असे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

भारताचे चोख प्रत्युत्तर

निज्जर या दहशतवाद्याला संसदेत श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कॅनडाच्या कृतीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कॅनडातील व्हँक्यूव्हर येथील भारताच्या दूतावासाने कॅनडाला 1985 च्या एका भीषण घटनेची आठवण करुन दिली आहे. 1985 मध्ये ‘एअर इंडिया’च्या कनिष्क विमानाला शीख दहशतवाद्यांनी घातपात करुन उडविले होते. या दहशतवादी हल्ल्यात विमानातील सर्व 329 प्रवासी मृत्यूमुखी पडले होते. 23 जूनला या दहशतवादी हल्ल्याला 39 वर्षे होत आहेत. त्या दिवशी कॅनडामध्ये भारतीय दूतावासाकडून या हल्ल्यात बळी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम व्यापक प्रमाणावर करण्यात येणार आहे. कॅनडा सरकारच्या छत्रछायेखाली पोषण होत असलेला खलिस्तानी दहशतवाद किती घातक आहे, याची जाणीव या कार्यक्रमातून तेथील जनतेला करुन दिली जाणार आहे. कॅनडा संसदेने निज्जरला दिलेल्या श्रद्धांजलीला हे प्रत्युत्तर असेल.

Advertisement
Tags :

.