लेबनॉनवर ‘ग्राउंड अटॅक’ची इस्रायलची तयारी
शेकडो रणगाडे अन् हजारो सैनिक सीमेवर दाखल
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलने शेकडो रणगाडे अणि आर्म्ड व्हीकल्सना लेबनॉनला लागून असलेल्या सीमेनजीक तैनात केले आहे. इस्रायल अत्यंत लवकरच कुठल्याही क्षणी लेबनॉनवर थेट हल्ला करू शकतो म्हणजेच प्रत्यक्ष जमिनीवर युद्धाची सुरुवात होऊ शकते. इस्रायलच्या उत्तरेत लेबनॉनचा दक्षिण हिस्सा आहे. इस्रायलकडून हे हल्ले कधी आणि कोणत्या क्षणी होतील याचा खुलासा सध्या झालेला नाही. तर दुसरीकडे लेबनॉनने संयुक्त राष्ट्रसंघासमोर हे युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची याचना केली आहे.
हिजबुल्लाहचे दहशतवादी याच स्वत:च्या बालेकिल्ल्यातून सर्वाधिक हल्ले करत असतात. लेबनॉनमध्ये अलिकडेच कोवर्ट ऑपरेशन करत इस्रायलने जगाला धक्का दिला होता. हे कोवर्ट ऑपरेशन पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटाचे होते. या स्फोटांमुळे हिजबुल्लाहचे शेकडो सदस्य गंभीर जखमी झाले असून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे.
आमचा देश संभाव्य ग्राउंड अटॅकसाठी सज्ज असल्याचे उद्गार इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलेंट यांनी काढले आहेत. याचा अर्थ इस्रायल कुठल्याही क्षणी जमिनीवरील युद्धाची सुरुवात करू शकतो. गाझापट्टीत ज्याप्रकारे शिरून हमासचा खात्मा करण्यात आला, त्याचप्रकारे लेबनॉनमध्ये घुसून हिजबुल्लाहचा खात्मा करण्याची योजना इस्रायलने आखली आहे. संरक्षणमंत्री गॅलेंट यांनी सैन्यप्रमुख लेफ्टनंट जनरल हर्जी हालेवी यांना हिजबुल्लाह विरोधात हल्ले करत राहण्याचा निर्देश दिला आहे.
हिजबुल्लाहला मिळू नये संधी
हिजबुल्लाह आणि त्याच्या म्होरक्यांना कुठल्याही प्रकारची संधी मिळू नये. हिजबुल्लाहचे अस्तित्वच पूर्णपणे संपविण्यात यावे असे गॅलेंट यांनी एका बैठकीत म्हटले आहे. या बैठकीत ऑपरेशन्स डायरेक्टोरेट मेजर जनरल ओडेड बासक आणि गुप्तचर प्रमुख मेजर जनरल श्लोमी बिंडर उपस्थित होते.
मरकावा रणगाडा
मरकावा हा इस्रायलचा मुख्य रणगाडा आहे. याचे 4 वेरिएंट्स इस्रायलकडे आहेत. 65 टनाचा हा रणगाडा 4 क्रू सदस्य आणि 6 सैनिकांसोबत युद्धभूमीत उतरतो. याच्या बाहेर लावण्यात आलेल्या कवचाविषयी इस्रायलने कधीच वाच्यता केलेली नाही. यात 120 मिलिमीटरची स्मूथबोर गन लावलेली असते. तसेच हा रणगाडाविरोधी निर्देशित क्षेपणास्त्र लॅहेट डागण्याची क्षमता या रणगाडयात आहे. याचबरोबर यात 12.7 मिलिमीटरची मशीन गन, 3 7.62 मिलिमीटरच्या मशीन गन्स, 1 मोर्टार लाँचर, 1 इंटरनल मोर्टार लाँचर आणि 12 स्मोक ग्रेनेड लाँचर बसविण्यात आले आहेत.