स्लीपर ‘वंदे भारत’ची लवकरच ट्रायल रन
बेंगळूरमध्ये पहिला रॅक तयार : ट्रेनमध्ये 16 डबे, 827 बर्थ : 160 प्रतितास वेगाने धावणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच एक नवीन युग सुरू होणार आहे. यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळांवर धावेल. या ट्रेनमध्ये ‘तेजस’चा वेग, ‘राजधानी’ एक्स्प्रेसमधील आरामदायीपणा आणि ‘वंदे भारत’च्या आधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण मिश्रण असणार आहे. सध्या भारतीय रेल्वे पूर्ण वेगाने ट्रायल रनची तयारी करत असून प्रवासी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बेंगळूरमधील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) कारखान्यात दोन रॅक तयार केले जात आहेत. यापैकी एका रॅकचे काम पूर्ण झाले असून पहिला रॅक येत्या 12 डिसेंबर रोजी उत्तर रेल्वेसाठी रवाना होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल रन म्हणजेच प्रायोगिक चाचणी पाटणा-दिल्ली मार्गावर सुरू होतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. चाचणी यशस्वी झाल्यानंतर सदर मार्गावर नियमित रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. महिन्याच्या अखेरीस नियमित सेवा सुरू होतील, असे दानापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत भाष्य करताना ही ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी गेमचेंजर ठरेल, असे म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली-पाटणा या मार्गावर ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई-पाटणा आणि बेंगळूर-पाटणा या मार्गांवरही वंदे भारत स्लीपर रेल्वे सुरू करण्याचा मानस आहे.
तीन वर्गांमध्ये आरामदायी प्रवास
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण 16 कोच असतील. या डब्यांमध्ये 827 बर्थ असतील. थर्ड एसीमध्ये 11 कोच (615 बर्थ), सेकंड एसीमध्ये 4 कोच (188 बर्थ) आणि फर्स्ट एसीमध्ये 1 कोच (24 बर्थ) आहेत. गरज पडल्यास कोचची संख्या 24 पर्यंत वाढवण्याचेही नियोजन आहे. प्रवाशांना रात्री आरामात झोपून प्रवास करता येण्यासाठी ही ट्रेन डिझाइन करण्यात आली आहे. थर्ड एसीचे अंदाजे भाडे सुमारे 2,000 रुपयांपर्यंत असण्याची अपेक्षा आहे. हे भाडे राजधानी रेल्वेच्या दराइतकेच असले तरी वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
आधुनिक सुविधांसह हाय स्पीड रेल्वे
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक बर्थवर वैयक्तिक वाचन दिवे आणि प्रीमियम इंटीरियर असतील. सुरक्षेसाठी, कवच अँटी-कोलिजन सिस्टम आणि क्रॅश-प्रूफ बॉडी डिझाइन बसवण्यात आले आहे. याचा कमाल वेग प्रतितास 160-180 किमी असेल. या वेगामुळे दिल्ली-पाटणा प्रवास 11 ते साडेअकरा तासांत पूर्ण होईल.