कोल्हापूर- गगनबावडा मार्गावरील वृक्ष लागवड निर्णायक टप्प्यावर
कोल्हापूर :
कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर झालेल्या वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, निसर्गप्रेमी आणि ‘वर्ल्ड फॉर नेचर‘ संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोल्हापूर वनविभागाने विशेष प्रकल्प कार्यकारी अभियंत्यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. झाडे तोडल्याच्या मोबदल्यात नियमानुसार झाडांची लागवड न केल्यामुळे ही कारवाई केली आहे.
- 1,394 झाडांची बदल्यात 5,576 लागवडीची अट
कोल्हापूर कळे मार्गावरील रस्ते कामासाठी 1394 झाडांची तोड करण्यात आली होती. नियमांनुसार एका झाडाच्या बदल्यात चार झाडे लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार 5576 झाडांची लागवड आवश्यक आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कृती झालेली नव्हती.
- निसर्गप्रेमींच्या दबावामुळे ठेकेदाराचा बोगस प्रयत्न
निसर्गप्रेमींच्या दबावामुळे आणि वनविभागाच्या नोटीसनंतर, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ठेकेदाराने घाईघाईत नियम धाब्यावर बसवून 5 एकर क्षेत्रात 300 विदेशी झाडांची लागवड केली. यामध्ये ना स्थानिक जैवविविधतेचा विचार केला गेला, ना लागवडीसाठी योग्य नियोजन. ही वृक्षलागवड म्हणजे केवळ वर्क ऑर्डरमधील अटी पूर्ण केल्याचा बनाव असून, निसर्गविरोधी आणि अशास्त्राrय पद्धतीने सोपस्कार उरकले गेले आहेत.
- धुळफेक उघड
भर पावसात ‘वर्ल्ड फॉर नेचर‘च्या प्रतिनिधींनी पन्हाळा तालुक्यातील इंजोळे गावात भेट देऊन हा बनावट कारभार प्रत्यक्ष पाहिला विदेशी झाडांची असंगत लागवड लागवडीसाठी कोणतीही योग्य जागा निवडलेली नाही पाण्याची, देखभालीची कोणतीही पूर्वतयारी नाही. या प्रकारामुळे वनविभागाच्या नियमांची व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या जबाबदारीची खुलेआम पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे.
- जैवविविधतेचा मुद्दा ऐरणीवर
वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात ठेकेदाराने स्थानिक देशी वृक्षांच्या जागी विदेशी वृक्षांची लागवड करून वनविभागाच्या मान्यताप्राप्त निकषांचे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकारामुळे संपूर्ण परिसंस्थेची आणि जैवविविधतेची गंभीर हानी होत असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी अरुण सावंत, दिग्विजय शिर्के, निर्मला पाटील, परितोष उरकुडे, अभिजीत वाघमोडे, प्रियांशु बेदरे, सविता साळोखे, निलेश भोसले आदी उपस्थित होते.
- वन आणि महामार्ग विभागांची जबाबदारी
वनविभागाने आपल्या नियमांची होणारी पायमल्ली गांभीर्याने घ्यावी. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठेकेदाराच्या फसव्या वृक्षलागवडीवर कारवाई करावी जनतेच्या डाळयात धुळफेक थांबवावी
रस्ते रुंदीकरण महत्त्वाचे असले तरी, ते निसर्गविरोधी पद्धतीने न करता शाश्वत विकासाच्या मार्गाने व्हावे, हीच आमाची मागणी आहे. हा विषय निसर्ग व प्रशासनाच्या प्रामाणिकतेचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.
अभिजीत वाघमोडे, कार्यवाह, नेचर फॉर वर्ल्ड