इंडिपेंडंट रोडवरील ‘तो’ वृक्ष अर्धवट तोडला
कॅन्टोन्मेंटच्या कारभाराविरुद्ध स्थानिकात संताप
बेळगाव : इंडिपेंडंट रोड येथे धोकादायक वृक्षाच्या फांद्या घरावर कोसळल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डने वनविभागाच्या सहकार्याने झाड हटविण्याच्या कामाला सुरुवात केली खरी. परंतु, झाड अर्धवट हटविल्याने पुन्हा धोका निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी झाड तोडण्याची मोहीम थांबविल्याने ते झाड कोसळून नुकसान झाल्यास त्याला कॅन्टोन्मेंट जबाबदार राहील, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. बुधवारी इंडिपेंडंट रोडवरील मंगेश होंडाच्या मागे गोजे बिल्डींग येथे वडाच्या झाडाची फांदी कोसळून विजया माणगावकर यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. वारंवार तक्रार करून देखील धोकादायक झाड हटविण्यात न आल्याने नाराजी व्यक्त होत होती. अखेर दोन दिवसांनी झाड हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली. जमिनीपासून 10 फुटांवरील फांद्या हटविण्यात आल्या.
कॅन्टोन्मेंटच्या सीईओंची आज भेट घेणार
नागरिकांच्या मागणीनुसार धोकादायक वृक्षाच्या पाच फुटावरील फांद्या व खोडही हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने रविवारी ही मोहीम थांबविण्यात आली. यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धोकादायक वृक्ष म्हणून कॅन्टोन्मेंटला निवेदन देऊन देखील नागरिकांची गैरसोय होत असताना आता अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. यासंदर्भात सोमवारी कॅन्टोन्मेंटच्या सीईओंची भेट घेतली जाणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.