वृक्षमाता सालुमरद तिम्मक्का यांचे निधन
अनेक मान्यवरांकडून शोकभावना : आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ बेंगळूर
पद्मश्री पुरस्कार विजेत्या शतायुषी सालुमरद तिम्मक्का (वय 114) यांचे शुक्रवारी निधन झाले. वृक्षमाता म्हणून त्यांची देशभरात ओळख होती. वृद्धापकालिन आजार आणि श्वसनावेळी त्रास जाणवत असल्याने तिम्मक्का यांच्यावर बेंगळुरातील खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या.
गेल्या काही दिवसांपासून तिम्मक्का यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत होते. दोन नोव्हेंबर रोजी अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने बेंगळूरच्या जयनगर येथील अपोलो इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचे निधन झाले. शनिवारी दुपारी 12 वाजता बेंगळूरच्या ज्ञानभारती येथील कलाग्राममध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी रविंद्र कलाक्षेत्र येथे सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत पार्थिक अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली.
सालुमरद तिम्मक्का यांचा जन्म 30 जून 1911 रोजी तुमकूर जिल्ह्याच्या गुब्बी तालुक्यात झाला होता. बेंगळूर दक्षिण जिल्ह्याच्या (आधी रामनगर) मागडी तालुक्यातील हुलिकल येथील बिक्कल चिक्कय्या यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मूल न झाल्याने या जोडप्याने दु:खाचा विसर पडावा म्हणून कडूर ते हुलिकल दरम्यानच्या राज्य मार्ग क्र. 94 वर 385 वटवृक्षांची लागवड केली होती. या वृक्षांनाच मुले मानून त्यांचे संगोपन केले होते. आपल्या हयातीत त्यांनी 8 हजारपेक्षा अधिक वृक्ष लागवड केली. त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेक अबालवृद्धांनी वृक्षारोपण व संवर्धन केले आहे. वनखात्याने सालूमरद तिम्मक्का यांच्या नावाने वृक्षोद्यानही सुरू केले.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्याबद्दल 2019 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. निरक्षर असूनही पर्यावरण संरक्षणकार्यात दिलेल्या योगदानाची दखल घेत कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाने मानद डॉक्टरेट आणि हंपी विद्यापीठाने नाडोज पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय नागरी पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार, वीरचक्र पुरस्कार, कर्नाटक कल्पवल्ली पुरस्कार, पंपावती पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, वनमाता पुरस्तार, श्रीमाता पुरस्कार, कर्नाटक पर्यावरण पुरस्कार, महिला रत्न पुरस्कार, राज्योत्सव पुरस्कार, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचा विशालाक्षी पुरस्कार यासह विविध पुरस्कारांनी तिम्मक्का यांचा सन्मान करण्यात आला होता.
अनेक मान्यवरांकडून शोक
तिम्मक्का यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, बसवराज बोम्माई, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह अनेक आमदार, खासदारांनी शोक व्यक्त केला आहे.