मनपा आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
न्यायालय अवमान प्रकरणानंतर आयुक्त संतापले : वेतन घेता काम नको? यापुढे कोणाचीही गय नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेवर 20 कोटी भरण्याची नामुष्की आल्यामुळे महापालिका आयुक्त हे चांगलेच संतापले. त्यांनी शनिवारी महानगरपालिकेतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन चांगलीच झाडाझडती घेतली आहे. न्यायालयाचा अवमान झाल्यानंतर त्याची माहिती मला देता, तोपर्यंत तुम्ही काय करत होता? असा संतप्त प्रश्न विचारून साऱ्याच अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
शहापूर येथील त्या जागामालकाला अंदाजे 20 कोटी देण्याचा आदेश न्यायालयाने बजावला होता. याबाबत उच्च न्यायालयामध्ये संबंधित विभागाने पाठपुरावा योग्यप्रकारे केला नाही. त्यामुळे संबंधित जागामालकाने अवमान याचिका दाखल केली. न्यायालयानेही आपल्या निर्णयाचा अवमान केला म्हणून तातडीने ही रक्कम भरण्याचे आदेश दिले. त्यामुळे महानगरपालिका अडचणीत येताच मोठी खळबळ उडाली. रक्कम भरल्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे तातडीने कौन्सिल बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विरोधी गटाने अधिकाऱ्यांबरोबरच सत्ताधारी गटावर जोरदार हल्लाबोल केला.
महानगरपालिकेमध्ये घाईगडबडीत 20 कोटी प्रांताधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र अजूनही ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. गेल्या आठ दिवसांपासून महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, कायदा सल्लागार उमेश महांतशेट्टी यांनी उच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. रक्कम जमा झाल्यानंतर प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे सांगितले. यामुळे महानगरपालिका आयुक्त संतापले होते.
महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. यावेळी सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. तुम्हाला सरकार पगार देते, मात्र काम करण्याकडे तुमचे दुर्लक्ष होत आहे, हे योग्य आहे का? याचे आत्मचिंतन करा. न्यायालयाचा अवमान होईपर्यंत तुम्ही काम करत नाही. मात्र यामुळे त्याचा फटका मला बसला. अशाप्रकारे जर कामचुकारपणा करत असाल तर कठोरात कठोर कारवाई करू, असा इशारा बैठकीत दिला आहे.
सध्या जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, तसेच लवादाकडे किती खटले प्रलंबित आहेत, याची माहिती त्यांनी घेतली. कोणत्या खटल्याचे कामकाज कुठपर्यंत झाले आहे, संबंधित विभागाने सर्व कागदपत्रे जोडली आहेत का? याची माहिती घेतली. यावेळी काही अधिकाऱ्यांना खटल्याची माहितीच नव्हती. त्यामुळे अशोक दुडगुंटी यांनी त्यांना धारेवर धरले. महानगरपालिकेमध्ये काम करता, मात्र त्याची तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे तुम्ही दिवसभर काय करता? असा प्रश्न विचारला. आयुक्तांचा संताप पाहून साऱ्यांचीच घाबरगुंडी झाली होती.
कायदा सल्लागारांची तक्रार
कायदा सल्लागार उमेश महांतशेट्टी यांनी काही विभागांकडून आपणाला सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी जाब विचारून येत्या दोन दिवसांत संपूर्ण कामकाज पूर्ण झाले पाहिजे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
शनिवारी दुपारी आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या एकूण खटल्यांची आकडेवारी व कामाची माहिती घेण्यात आली आहे. यापुढे अशाप्रकारे न्यायालय अवमानाचा प्रकार घडला तर गय केली जाणार नाही, असेही आयुक्तांनी सुनावले आहे.