उचगाव फाटा-बाची रस्त्यावरील वृक्ष-फांद्या हटविल्या
वनविभागाकडून त्वरित कार्यवाही : प्रवाशांतून समाधान
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील उचगाव फाटा ते बाची दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा जीर्ण झालेले मोठमोठे वृक्ष आणि फांद्यांपासून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना यापासून होणारा धोका टाळण्यासाठी वनविभागाने सदर फांद्या, वृक्ष काढण्याची मोहीम हाती घेऊन ती फत्ते केली. गेल्या दहा-पंधरा दिवसांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक महामार्गावरील वृक्ष कोसळून जीवितहानी आणि अपघात घडले आहेत. यासाठी बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरही कोणताही अनर्थ घडू नये याची दक्षता म्हणून वनविभागाने तुरमुरी गावाजवळील रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठे जीर्ण वृक्ष तसेच अनेक फांद्या रस्त्यावर आलेल्या होत्या. त्या केव्हाही वाऱ्याच्या तडाख्याने कोसळून मोठा अनर्थ घडू शकतो. तसेच एखादा वृक्ष कोसळला तर वाहतुकीचीही अनेक वेळेला कोंडी होते. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सदर फांद्या व वृक्ष हटविल्या. यामुळे अनेक प्रवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वृक्षारोपण करा
बेळगाव-वेंगुर्ला हा महत्त्वाचा महामार्ग असून बेळगाव ते बाची या 15 किलोमीटरच्या अंतरामधील रस्त्याच्या दुतर्फा जिथे वृक्ष नाहीत अशा भागात वनखात्याने याच पावसाळ्यात पुन्हा नवीन रोपांची लागवड करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वृक्ष तोडल्यानंतर सदर मार्ग हा भकास होऊ नये. या भागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सावलीही मिळावी. यासाठी आतापासूनच ज्या ठिकाणचे वृक्ष काढण्यात आले त्या ठिकाणी पुन्हा नवीन रोपांची लागवड करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.