स्तनाच्या कर्करोगावर चुंबकीय नॅनो कणांव्दारे उपचार
कोल्हापूर :
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. यावर विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत. यात भर घालण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक प्राध्यापक डॉ. गजानन राशीनकर आणि डॉ. प्रज्ञा पाटील यांनी स्तनाच्या कर्करोगावरील हाइपरथर्मिया (प्ब्जूपस्ग्a) उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती केली आहे. नॅनो कणांव्दारे स्तनाचा कर्करोग मुळापासून नष्ट करण्यास मदत होणार आहे. संशोधनाचा दर्जा पाहूनच या संशोधनाला भारतीय व आंतरराष्ट्रीय युकेचे पेटंटही प्राप्त झाले आहे. आता पुढील प्रक्रिया म्हणून लॅबमध्ये नॅनो कणांचा प्रयोग उंदरावर करून तो यशस्वी झाल्यानंतर हे औषध बाजापेठेत आणण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
विशेषत: महिलांमध्ये मुखातील कर्करोगाप्रमाणेच स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. वेळीच उपचार केल्यास या रूग्णांना किमान पुढे 10 ते 20 वर्षे आयुष्य जगता येते. परंतु पुढे जाऊन पुन्हा कर्करोगाच्या पेशी तयार होतात आणि पुन्हा रूग्णांना कर्करोगाचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाच्या पेशीच नष्ट करण्यासाठी डॉ गजानन राशीनकर, डॉ. पद्मा पाटील यांनी नॅनो-मॅग्नेटाईटच्या अतिसूक्ष्म रेणूवर विविध रासायनिक अभिक्रिया करून त्यावर एन-हेटेरोसायक्लिक कार्बिनचे (एन.एच.सी.) आवरण चढवले. त्याची सोने या धातूसोबत प्रक्रिया करून या चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती केली आहे.
हे चुंबकीय नॅनो कण कर्करोगावरील हाइपरथर्मिया उपचार पद्धतीमध्ये अतिशय प्रभावीपणे वापरले जाणार आहेत. चुंबकीय नॅनो कणांच्या विशिष्ट संरचनेमुळे ते स्तनाच्या कर्करोगकारक पेशींना जोडले जातात. अशा जोडल्या गेलेल्या नॅनो कणांवर जेव्हा चुंबकीय बल टाकले जाते, तेव्हा सतत बदलत जाणाऱ्या चुंबकीय लहरींच्या प्रभावामुळे हे कण उष्णता उत्सर्जित करतात. या प्रक्रियेदरम्यान साधारणपणे 40 ते 48 अंश सेंटीग्रेड इतके तापमान निर्माण होते. त्यामुळे कर्करोगांच्या पेशींची अंतर्गत रचना ढासळते आणि त्या नष्ट होतात. हे नॅनोकण कर्करोगाच्या गाठीला रक्तपुरवठा करणाऱ्या विविध रक्तवाहिन्यांची वाढ थांबवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या प्रक्रियेदरम्यान इतर पेशींना अपाय न करता स्तनाच्या कर्करोगांच्या पेशी नष्ट करण्याकरिता या नॅनो कणांचा प्रभावी उपयोग होतो. हे संशोधन एन-हेटेरोसायक्लिक कार्बिन आणि मूलभूत धातूंपासून नवनवीन नॅनो कणांची निर्मिती करणाऱ्या संशोधन क्षेत्राला दिशादर्शक ठरणार आहे.
उंदरांवर प्रयोग केला जाणार
उंदरांमध्ये कॅन्सर निर्मिती करून त्यावर नॅनो कणांचा प्रयोग करण्यात येणार आहे. उंदरांवरील प्रयोग यशस्वी झाल्यास नॅनो कणांची प्री-क्लिनिकल चाचणी केली जाईल. त्यानंतर विद्यापीठातील इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅंड लिंकेजस केंद्रात या संशोधनाची नोंद केली जाईल. या केंद्रातून येणाऱ्या सुचनांचे पालन करून विविध औषध निर्माण कंपन्यांशी संपर्क साधून पुढील दिशा ठरवली जाणार आहे. त्यासाठीगतीने पुढील प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय संशोधकांनी घेतला आहे.
दहा वर्षाच्या श्रमाला यश
महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी शरीरात होणाऱ्या कर्करोगाच्या पेशीच मुळापासून संपवण्यासाठी 10 वर्षापासून संशोधन करीत होतो. या अनंत अडचणींचा सामनाही करावा लागला. परंतु अडचणींवर मात करत संशोधन यशस्वी करून पेटंटसाठी प्रस्ताव पाठवला. या संशोधनाला भारतीय तसेच युके अशी दोन पेटंट मिळाली आहेत. त्यामुळे दहा वर्षाच्या श्रमाला यश आल्याचा आनंद आहे. पुढील प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे.
डॉ. गजानन राशीनकर, रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ