दहावी-बारावी परीक्षेसाठी विभागात 533 केंद्रे
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी-बारावी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधांची पाहणी केली. दहावी परीक्षेसाठी 357 तर बारावी परीक्षेसाठी 176 अशी 533 केंद्रे निश्चित केली आहेत. दहावीसाठी सातारा 116, सांगली 103, कोल्हापूर 138 परीक्षा केंद्रे आहेत. बारावीसाठी सातारा 52, सांगली 51, कोल्हापूर 73 परीक्षा केंद्रे आहेत.
दहावी-बारावीची परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून परीक्षा केंद्राची नियुक्ती केली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या शाळेस संरक्षक भिंत, परीक्षार्थी संख्येच्या प्रमाणात वर्गखोल्या, बेंचेस, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे, पंखे, वीज दिवे, सुस्थितीतील दारे, जाळी लावलेल्या खिडक्या, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, वीज गेल्यास पर्यायी व्यवस्था जनरेटर अथवा इनव्हर्टर इत्यादी भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. यातील काही सुविधा नादुरुस्त अथवा अपूर्ण असू शकतात त्यामुळे परीक्षा घेण्यास अडचणी येऊ शकतात. परीक्षा केंद्रास मान्यता मिळाल्यानंतर सुविधांमध्ये त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विभागीय मंडळाने पत्राव्दारे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना केंद्राची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही सक्ती नाही
बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 21 ऑगस्ट रोजी शासन निर्णयाद्वारे शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या शाळेत, शाळा परिसरात व ज्या शाळांना शक्य आहे, त्या शाळांनी प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षेसाठी प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य (सक्तीचे) केलेले नाही, असे विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
परीक्षा केंद्रांवरील त्रुटीची पुर्तता 10 जानेवारीपर्यंत करावी
आवश्यक सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी यांना 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षार्थी संख्येच्या प्रमाणात त्रुटी अथवा अपूर्णता आढळल्यास शाळांना या कालावधीत पूर्तता करावी लागणार आहे.
राजेश क्षीरसागर (विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ)