ट्रॅव्हिस हेडला बॉर्डर तर सदरलँड बेलिंडाला क्लार्क पदक
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांचे वितरण सोमवारी होऊन त्यात स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेटपटूसाठीचे प्रतिष्ठित अॅलन बॉर्डर पदक प्रदान करण्यात आले तर युवा अष्टपैलू महिला खेळाडू अॅनाबेल सदरलँडला बेलिंडा क्लार्क पदक देण्यात आले. क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 1427 धावा करून उत्कृष्ट वर्ष नोंदविलेल्या हेडला पुरस्कारांसाठीच्या मतदानात 208 मते मिळाली आणि त्याने जोश हेझलवूड (158 मते) आणि पॅट कमिन्स (147 मते) यांना मागे टाकले.
31 वर्षीय हेडने एकदिवसीय क्रिकेटमधील वर्षाच्या सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कारही जिंकला आणि ट्वेंटी-20 तसेच कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या पुरस्कारांच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पुरस्कारासाठीच्या कालावधीत ऑस्ट्रेलिया खेळलेल्या 11 एकदिवसीय सामन्यांपैकी फक्त पाच सामन्यांमध्ये खेळूनही हेडने हा पुरस्कार जिंकला. ट्रेंट ब्रिज येथील इंग्लंडविरुद्धच्या नाबाद 154 धावांच्या खेळीसह केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला अॅलेक्स केरी, स्टीव्ह स्मिथ आणि झेवियर बार्टलेट यांना मागे टाकण्यास मदत झाली.
सदरलँडसाठी हा पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार असून तो एमसीजीवरील तिच्या पहिल्या कसोटी शतकानंतर काही दिवसांतच प्राप्त झाला आहे. त्या मैदानावर शतक झळकावणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला, तर भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या बॉक्सिंग डे कसोटीत वयाच्या 19 व्या वर्षी प्रभावी पदार्पण केलेला तऊण क्रिकेटपटू सॅम कोन्स्टासला ‘यंग क्रिकेटर ऑफ दि इयर’ म्हणून गौरविण्यात आले.
इतर पुरस्कारांमध्ये अॅश्ले गार्डनरला वर्षातील सर्वोत्तम महिला ‘वनडे’ खेळाडू म्हणून निवडण्यात आले, तर बेथ मुनीला तिसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम महिला टी-20 खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. 21 टी-20 सामन्यांमध्ये 35 बळी घेणारा लेगस्पिनर अॅडम झॅम्ंपाने हेडला तीन मतांनी मागे टाकत सर्वोत्कृष्ट पुऊष टी-20 खेळाडूचा किताब मिळविला. मूत्रपिंडांच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांबद्दल कॅमेरून ग्रीनला ‘कम्युनिटी इम्पॅक्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात मायकेल क्लार्क, मायकेल बेवन आणि क्रिस्टिना मॅथ्यूज यांना ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट करण्यात आले.