For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृत्यूंजय चौकाला ट्रॅव्हल्स, स्ट्रीटलाईटचा अडथळा

05:57 PM Aug 14, 2025 IST | Radhika Patil
मृत्यूंजय चौकाला ट्रॅव्हल्स  स्ट्रीटलाईटचा अडथळा
Advertisement

सांगली / संजय गायकवाड :

Advertisement

सांगली शहरातील मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील खणभाग आणि गावभाग अशा महत्वाच्या दोन भागांना जोडणाऱ्या मृत्यूंजय चौकानजिक ट्रॅव्हल्स गाड्या आणि वापरात नसलेल्या स्ट्रीट लाईटच्या पोलचा मोठा अडथळा होत आहे. स्ट्रीट लाईटच्या बरोबर मध्ये असलेल्या खांबाला धडकून अनेक छोटे-मोठे अपघात होऊ लागले आहेत. मनपा आणि वाहतूक पोलिसांचे या चौकाकडे दुर्लक्ष झाले आहे. या चौकानजिक ट्रॅल्हल्सच्या गाड्या कशाही उभ्या राहत असताना वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. तर वापरात नसलेला विजेचा पोल हटविण्याबाबतही मनपाकडून हालचाल होत नाही. वापरात नसलेल्या विजेच्या पोलला धडकून कोणाचा तरी बळी गेल्याशिवाय महापालिकेला जाग येणार नाही, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

सांगलीतील चौक आणि अरूंद रस्त्यांची समस्या जवळपास सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात कायम आहे. सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या स्थलातंराचा प्रश्न कायम आहे. शिवाजी मंडई ते स्टैंड रोड या दरम्यान ट्रॅव्हसची अनेक कार्यालये आहेत. ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. पण ट्रॅव्हल्सच्या गाडयांना शिस्त नाही. या खासगी आरामगाड्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे.

Advertisement

या गाड्या उभ्या करताना वाहतुकीला अडथळा होवू नये, असे अपेक्षित आहे. मुळात शिवाजी मंडईकडून स्टैंडकडे जाणारा रस्ता खूपच अरूंद आहे. शिवाय या रोडवर गरवारे कॉलेजपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदेशीरपणे वाहने पार्क केलेली असतात. समोर दुकाने, मेडिकल्स, शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांची मोठी ये-जा सुरू असते. त्यामुळे मंडईकडून येणाऱ्या एसटी बसेस, ऊस हंगामावेळी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक, ट्रॅक्टर आणि समोर उभ्या केलेल्या टॅल्हर्ल्स यामुळे दिवसातून अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होतो.

बऱ्याचवेळेला शिवाजी मंडईच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या रोडवर काही कार्यक्रम असल्यास त्या रोडवरील वाहतूक गरवारे कॉलेजसमोरील रोडकडून वळविण्यात येते. त्यामुळे येथील बेकायदेशीरपणे पार्क केलेली सर्व वाहने हटविण्याबरोबरच ट्रॅव्हर्ल्स गाड्यांना शिस्त लावण्याची आवश्यकता आहे.

मृत्यूंजय चौकानजिक गरवारे कॉलेजसह डॉ. बापट बाल शाळा आहे. त्यामुळे शाळा भरताना व सुटताना शाळेचे जे विद्यार्थी व पालक मृत्यूंजय चौकातून खणभागासह शाहू उद्यान तसेच क्रांती क्लिनिककडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या दिशेला जातात. त्या सर्वांना या चौकातून ये-जा करताना मंडईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून रस्ता  समजत नाही. या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांकडे पालक व नागरिकांकडून हा पोल हटविण्याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या. पण त्याबाबत मनपाकडून कोणतही कार्यवाही झालेली नाही. मनपा आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून शहराला शिस्त लावण्यासाठी एसटी बसेस ये-जा करण्याच्या मार्गावर कोणत्याही परिस्थितीत हातगाड्यांना परवानगी दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात मात्र मंडई ते स्टैंड या दरम्यान रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी हातगाड्यांनी अक्षरशः विळखा घातलेला आहे. मंडईनजिक अडथळे आणि मोकाट कुत्रे आडवे आल्याने दोनच दिवसांपूर्वी येथे एक दुचाकीस्वार गाडीवरून पडून जखमी झाला.

मृत्यूंजय चौकानजिक मोकाट कुत्री आणि भटकी जनावरे यांचीही समस्या आहे. येथे कुत्र्यांच्या झुंडी आहेत. यातील काही मोकाट कुत्री ही वाहनांचा पाठलाग करतात. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चौकानजिक स्टँडकडून मंडईपर्यंत मागील पाच वर्षांपूर्वी केलेली मोठी गटार कधी तरी साफ केली जाते. मुळातच ही गटार खूप मोठी झाली आहे. ती थोडी लहान केली तर रस्ता आणखी मोठा झाला असता. वाहनांनाही ये-जा करणे सोयीचे झाले असते. मोकाट कुत्री पकडण्यासाठी मनपाची डॉगव्हॅन इकडे कधी फिरकत नाही.

Advertisement
Tags :

.