For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समस्यांच्या विळख्यात अडकली... आंबेडकर गल्ली

12:16 PM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
समस्यांच्या विळख्यात अडकली    आंबेडकर गल्ली
Advertisement

बेळवट्टीतील समस्या : पाईप लाईनला गळती, दूषित पाणीपुरवठा : नागरिकांचे आरोग्य धोक्यात : ग्रा. पं.चे दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर/किणये 

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी खेड्याकडे चला, असा संदेश दिला. कारण खरा भारत खेड्यातच राहतो. देशाचा विकास व्हायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळवट्टी येथील आंबेडकर गल्ली विकासापासून दूर राहिली आहे. दूषित पाणी पुरवठा, पाईपलाईनला गळती, अर्धवट स्थितीतील गटारे आदी समस्यांच्या विळख्यात ही गल्ली आहे. गेल्या वर्षभरापासून गल्लीतील गटारींची साफसफाई करण्यात आली नाही. गटारींमध्ये केरकचरा साचलेला आहे. गटारीच्या बाजुने गवत व झुडूपे वाढलेली आहेत. याकडे ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून करण्यात येत आहेत. ग्राम पंचायतीमार्फत मुलभूत सुविधा पुरविण्यात येत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी दाद मागायची कोणाकडे, असा सवाल आंबेडकर गल्लीतील ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Advertisement

पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती 

बेळवट्टी हे धरणग्रस्त गाव आहे. राकसकोप धरणाजवळील विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे गावातील माध्यमिक विद्यालयाजवळ असलेल्या टाकीत सोडण्यात येते. या टाकीतील पाणी पाईपलाईनकडून गावाला पुरविण्यात येते. आंबेडकर गल्लीतील पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. काही ठिकाणच्या पाईप या चक्क गटारींमधून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. प्रशासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून त्याचे प्रसिद्धीकरण करण्यात येते. बेळवट्टीमध्ये आंबेडकर गल्लीत स्वच्छता अभियान कधी राबविणार? असा प्रश्न नागरिक करत आहेत. गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून गवत व झाडेझुडूपे वाढलेली आहेत. यामुळे पावसाच्या व गटारीतील पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

कंत्राटदाराला जाब विचारणे गरजेचे

गेल्या सहा ते आठ महिन्यापूर्वी गटारींचे कामकाज करण्यात आले. मात्र काही ठिकाणी हे कामकाज अर्धवट स्थितीत आहे. ग्राम पंचायतीला याबद्दल माहिती देण्यात आली. तरीही याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. या कामकाजाबद्दल सदर कंत्राटदाराला जाब विचारणे गरजेचे आहे. आता यासाठी पुढाकार घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समस्या त्वरित सोडवा, अन्यथा मोर्चा!

गेल्या वर्षभरापासून आंबेडकर गल्लीत विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आम्हा नागरिकांना रोज दूषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे नागरिक आजारी पडू लागले आहेत. लोकांचे आरोग्य धोक्यात आल्यास याला जबाबदार कोण, गटारींची साफसफाई व पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासंदर्भात अनेकवेळा ग्रामपंचायतीत जाऊन सांगितले आहे. नवीन पाईप आणलेल्या आहेत. पाईपलाईन बसवून देतो, स्वच्छता करतो, असे केवळ आश्वासनच ग्राम पंचायतीकडून मिळत आले आहे. प्रत्यक्षात कृती मात्र अद्याप झालेली नाही. ग्राम पंचायतीने आपल्या गल्लीतील समस्या त्वरित सोडवाव्यात, अन्यथा आम्ही गल्लीतील नागरिक ग्राम पंचायतीवर धडक मोर्चा काढणार आहे.

- मारुती बाळू कांबळे, नागरिक

Advertisement
Tags :

.