महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सह्याद्री व्याघ्रक्षेत्रात आठ वाघांचे स्थानांतरण

06:30 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने महाराष्ट्रातल्या चंद्रपूर परिसरातल्या आठ वाघांचे स्थानांतरण सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आणखी काही दिवसांनी सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र पट्टेरी वाघांच्या वास्तव्याने दणाणून निघणार आहे. 2022 साली झालेल्या व्याघ्रगणनेनुसार सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानाद्वारे इथे एकही पट्टेरी वाघ नसल्याचे उघडकीस आले होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने 2010 साली चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना अभयारण्याला सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरीत पट्टेरी वाघांबरोबर तेथे असलेल्या अन्य वन्यजीवांना कायदेशीररित्या हक्काची जागा उपलब्ध झाली. 600.12 चौरस किलोमीटरचे विशेष संरक्षण लाभलेले क्षेत्र आणि त्याच्या भोवताली 565.45 चौरस किलोमीटर त्यापेक्षा कमी संरक्षण कवच लाभलेले क्षेत्र अशी एकूण 1165.56 चौरस किलोमीटर क्षेत्रफळातल्या सधन जंगलक्षेत्राला व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून सरकारने अधिसूचित केले होते.

Advertisement

2018 साली सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात पाच ते सात पट्टेरी वाघांचा वावर असल्याचे त्यांचे ठसे, विष्टा आदींद्वारे स्पष्ट झाले होते. शिरशिंगे, पाली, म्हाळुंगे, नावजा, घाटमाथा आदी परिसरात वाघाचा वावर तेथील स्थानिकांनी वेळोवेळी अनुभवलेला होता. 2006 सालच्या व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्रात जी 103 वाघांची संख्या नोंद झाली होती, त्यात वाढ होऊन 2022च्या व्याघ्रगणनेत 444 पट्टेरी वाघ सहा व्याघ्र राखीव क्षेत्रांत असल्याचे प्रकाशात आलेले आहे. त्यातले 160 ते 170 वाघ एका चंद्रपूर जिल्ह्यात असून, ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे रुपांतर ताडोबा-अंधेरी व्याघ्र राखीव क्षेत्रात करण्यात आले परंतु खुद्द चंद्रपूर जिल्ह्यातल्या सधन जंगलांची आणि परिसरातल्या वनक्षेत्राची कत्तल साधनसुविधांच्या विविध प्रकल्पांबरोबर खनिज उत्खनन आणि तत्सम व्यवसाय तसेच उद्योगांसाठी करण्यात आल्याचे दिसले. त्याचप्रमाणे लोकवस्ती, शेती आणि बागायती विस्तारापायी मानव आणि पट्टेरी वाघ यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला गेला आणि त्यातून वाघांच्या हल्ल्यात स्थानिकांच्या मृत्यूतही लक्षणीय वाढ झाल्याने चंद्रपूरात जनप्रक्षोभ वाढलेला आहे. सध्या चंद्रपूरात वाघांची संख्या वाढलेली असून आणि त्यांच्यासाठी राखून ठेवलेला नैसर्गिक अधिवास अपुरा पडत असल्याकारणाने, स्थानिक आणि वाघ यांच्यातला जो संघर्ष वाढत चाललेला आहे, त्याला शमविण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने आठ पट्टेरी वाघांचे सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थानांतरण करण्याचे ठरविलेले आहे. एखाद्या व्याघ्र राखीव क्षेत्रात त्याच्या क्षमतेपेक्षा जेव्हा वाघांची संख्या वाढते, त्यावेळी त्यांचे स्थानांतरण अन्य व्याघ्र राखीव क्षेत्रात करण्याची प्रक्रिया 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे.

Advertisement

मध्य प्रदेशातील कान्हा आणि बांधवगड व्याघ्र राखीव क्षेत्रातून सहा वाघांचे स्थानांतरण करण्यासाठी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जेथे वाघांचे वास्तव्य लोप पावले होते, अशा ओडिशा राज्यातल्या सातकोशिया व्याघ्र राखीव क्षेत्राची निवड केली. त्यानुसार सुंदरी मादी आणि महावीर या नर वाघांचे स्थानांतरण सातकोशियामध्ये केले परंतु सुंदरी वाघिणीने आणि महावीर वाघाने प्रत्येकी एका व्यक्तीला ठार केल्याने, या स्थानांतरणाला होत असलेला विरोध वाढत गेला आणि शेवटी व्याघ्र प्राधिकरणाला आपला निर्णय स्थगित ठेवावा लागला. सातकोशियातल्या वाघांचे करण्यात आलेले स्थानांतरण अयशस्वी झाले. महावीर वाघाची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले तर सुंदरीला पिंजऱ्यात जेरबंद करून ठेवण्यात आले. भारतातले वाघांचे करण्यात आलेले स्थानांतरण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांची पायमल्ली करून घिसाडघाईने झाल्याकारणाने ते अयशस्वी ठरलेले आहे. सध्या नेपाळच्या सीमेलगत असणाऱ्या राजाजी व्याघ्र राखीव क्षेत्रातून 2006 पासून वाघांचे प्रजनन थांबल्याकारणाने आणि तेथे केवळ दोन वाघिणी शिल्लक राहिल्याने 200 किलोमीटर अंतरावरच्या कॉर्बेट व्याघ्र राखीव क्षेत्रातून वाघांचे स्थानांतरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

आज विकासाचे विविध प्रकल्प राबविताना पर्यावरण परिसंस्था आणि वन्यजीवांच्या अस्तित्वाला विशेष महत्त्व दिले जात नसल्याकारणाने जंगली श्वापदांसाठी राखून ठेवलेल्या नैसर्गिक अधिवासातून त्यांची परिस्थिती प्रतिकुल होऊ लागली आहे. 2002 साली राजस्थानातल्या अलवार जिल्ह्यातल्या सारिस्का व्याघ्रक्षेत्रात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला सोळा वाघांचे वास्तव्य असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. परंतु 2005 साली मात्र सारिस्का व्याघ्र क्षेत्रातून वाघ गायब झाल्याचे सत्य प्रकाशात आले होते. वाघांच्या होणाऱ्या शिकारीच्या प्रमाणात विलक्षण वाढ झाल्याने, सारिस्का वाघांसाठी स्मशानभूमी ठरली होती. कुख्यात शिकारी संसार चंदने आपण सारिस्कात चक्क चार वाघांची हत्या केल्याची कबुली दिली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून दोन वाघांचे सारिस्कात स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला. प्राधिकरण, राजस्थानातले वन खात्याचे अधिकारी आणि स्थानिक यांच्या समन्वयातून सारिस्कातल्या व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणासाठी जी उपाययोजना राबविण्यात आली, त्यामुळे 2021 मध्ये येथील वाघांची संख्या चौदावर पोहोचली. व्याघ्र स्थानांतरणाची जी योजना सारिस्कात राबविली ती यशस्वी ठरली तर ओडिशातल्या सातकोशियात मात्र सदरची योजना अपयशी ठरली.

अशा पार्श्वभूमीवरती सध्या प्राधिकरणाने चंद्रपूरातील आठ वाघांचे स्थानांतरण सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सह्याद्रीतले सधन जंगल, कोयना धरणाचा विस्तीर्ण जलाशय, राधानगरी-दाजीपूरातल्या संरक्षित जंगलक्षेत्राच्या पाठबळावरती आठ वाघांचे नियोजित स्थानांतरण यशस्वी होईल, असा प्राधिकरणाला विश्वास आहे. परंतु ही योजना यशस्वी करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राच्या परिसरात पूर्वापार वास्तव्यास असणाऱ्या स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांना त्याबाबत पूर्वकल्पना देण्याबरोबर जागृती करण्याची नितांत गरज आहे. यापूर्वी कर्नाटकातल्या काळी व्याघ्र राखीव क्षेत्रातून वाघाने म्हादई अभयारण्यातून चंदगड, सिंधुदुर्गची पायपीट करीत सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात प्रवेश केल्याचे कॅमेरा ट्रॅपद्वारे स्पष्ट झालेले आहे. कर्नाटकातल्या भीमगड अभयारण्याबरोबर वाघ काळी व्याघ्र राखीव क्षेत्रात गोव्यातल्या म्हादई, महावीर अभयारण्याबरोबर मोले राष्ट्रीय उद्यानात संचार, वास्तव्य करणार असल्याने गोव्यातल्या वन खात्याला आणि येथील स्थानिकांना विश्वासात घेण्याची नितांत गरज आहे. गोव्यातल्या राजकारण्यांनी म्हादईसारख्या अभयारण्यातला वाघांचा अधिवास नष्ट करण्याचा चंग बांधलेला असून, त्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सह्याद्रीत वाघांचे स्थानांतरण करण्यात आल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात विचार विनिमय करून नियोजनबद्ध आठ वाघांचे अस्तित्व इथे टिकेल आणि वृद्धिंगत होईल, यासाठी उपाययोजना, पूर्वतयारी करणे विशेष महत्त्वाचे आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article