तृतीयपंथीयांना मिळणार रेशनकार्ड
कोल्हापूर :
शासकीय कागदपत्रेच नसल्यामुळे शासनाच्या अनेक योजनापासून तृतीयपंथीयांना वंचित रहावे लागत होते. सद्या शासनाच्या धोरणामुळे तृतीयपंथीयांना कागदपत्रे मिळू लागली असून योजनांचा लाभही मिळत आहे. प्रशासनाने त्यांना रेशनकार्ड देण्याची तरतूद केली. यापूर्वी पहिल्या टप्यात 30 जणांना रेशनकार्ड देण्यात आली. आता दुसऱ्या टप्यातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज (दि. 7) 25 तृतीयपंथीयांना रेशनकार्डचे वितरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीते वितरण करण्यात येत आहे.
तृतीय पंथीयांना समाजात वेगळया नजरेने पाहिले जाते. यामुळे तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रथम त्यांची कागदपत्रे तयार करण्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरु झाले. शासकीय कागदपत्रेच नसल्याने त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. यामुळे काही महिन्यापूर्वी त्यांना आधारकार्ड देण्यात आले. यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली. प्रत्येक निवडणुकीत त्यांना मताचा अधिकारही मिळाला आहे. यानंतर शासनाने त्यांचे वेगळे पोर्टल तयार केले. पण खरी गरज होती त्यांना रेशनकार्डवर अन्नधान्य मिळण्याची. त्यासाठी रेशनकार्ड असणे आवश्यक होते. यामुळे प्रशासनाने त्यांना रेशनकार्ड देण्याची तरतूद केली.
त्याप्रमाणे यापूर्वी पहिल्या टप्यात 30 जणांना रेशनकार्ड देण्यात आली. त्यानंतर इतरांची कागदपत्रे पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु होती. आता दुसऱ्या टप्यातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे या दुसऱ्या टप्यात आज (दि. 7) 25 तृतीयपंथीयांना रेशनकार्डचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे त्यांना कार्डवरील प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे पाच किलो धान्य मिळणार आहे. टप्या- टप्याने सर्वांनाच हा लाभ देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकूण तृतीयपंथी संख्या- 450
लाभार्थ्यांनी कागदत्रासह अर्ज करावा
शहरात तृतीयपंथी, विधवा, परित्यक्त्या, सेक्स वर्कर, दिव्यांग, निराधार महिलांना लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अन्नधान्य वितरण कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज करावा.
नितीन धापसे-पाटील, नायब तहसीलदार
शासनाच्या निर्णयाचे स्वागत
तृतीयपंथीयांकडे शासकीय कागदपत्रेच नसल्याने या समाजाला शासनाच्या अनेक योजनापासून वंचित राहावे लागत होते.आता शासनाने आधारकार्ड दिल्यामुळे ओळख मिळाली आहे.तसेच रेशनकार्ड मिळाल्यामुळे अन्नधान्य मिळणार आहे.यामुळे दुर्लक्षित राहिलेला तृतीयसमाज मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे.शैक्षणिकदृष्ट्या हा समाज प्रगत होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
सुहासिनी आळवेळकर, मैत्री संघटना