बंगलो एरियासह कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करा
खासदार जगदीश शेट्टर यांची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण केले जाणार आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यामध्ये केवळ नागरी वसाहती हस्तांतरित केल्या जाणार आहेत. परंतु येथे अनेक बंगलो असून तो भागही महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावा, याबाबत आपण कॅन्टोन्मेंट बोर्डला सूचना कराव्यात, अशी मागणी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली. बुधवारी दिल्ली येथे राजनाथ सिंह यांचे भेट घेऊन हस्तांतरण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी चर्चा करण्यात आली. नागरी वसाहतीसोबत बंगलो एरियाही महापालिकेकडे द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली. परंतु कॅन्टोन्मेंट प्रशासनाने याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नागरिकांचा विरोध वाढला आहे.
6 जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये सर्वच लोकप्रतिनिधींनी आराखड्यामध्ये बदल सुचवला. परंतु बैठकीच्या इतिवृत्तामध्ये याची कुठेही नोंद झाली नाही. आराखडा तयार करताना नागरिकांची बाजू ऐकून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने नागरी वस्तीसोबत बंगलो एरियाही महापालिकेकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे, अशी भूमिका खासदारांनी संरक्षण मंत्र्यांसमोर मांडली. संरक्षण मंत्र्यांनी जगदीश शेट्टर यांचे म्हणणे ऐकून घेत या संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या. संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रस्तावित आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन संरक्षण मंत्र्यांनी दिले.