भारतीय कनिष्ठ फुटबॉलपटूंचे सराव शिबिर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या 17 वर्षांखालील वयोगटाची सॅफ चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धा तसेच येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या 17 वर्षांखालील आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेसाठी श्रीनगरमध्ये भारतीय युवा फुटबॉल संघासाठी सराव प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यापासून या शिबिरामध्ये प्रमुख प्रशिक्षक इशफाक अहम्मद यांचे युवा फुटबॉलपटूंना बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.
या सराव शिबिरामध्ये खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर अधिक लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये फुटबॉलपटूंकडून चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे अहम्मद याने म्हटले आहे. सॅफची 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेला अद्याप दोन महिने बाकी आहेत. ही स्पर्धा भूतानमध्ये 18 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे. या सराव शिबिरात दाखल झालेल्या युवा फुटबॉलपटुंमध्ये चांगली कामगिरी करण्याची पूर्ण क्षमता दिसून येते. फुटबॉलचे तंत्र अवगत करण्यात ते तरबेज असल्याचे दिसून येत आहे. या शिबिरामध्ये 32 फुटबॉलपटूंचा सहभाग आहे. गेल्या वर्षी भूतानमध्ये झालेल्या 16 वर्षांखालील वयोगटाच्या सॅफ चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघातील 16 फुटबॉलपटूंचा या शिबिरामध्ये समावेश आहे.