‘सैयारा’ चित्रपटाचा ट्रेलर सादर
अहान पांडे अन् अनित पड्डा मुख्य भूमिकेत
अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेचा आगामी चित्रपट सैयाराचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये प्रेम, रोमान्स, ध्यास अन् द्वेष सर्वकाही पहायला मिळत आहे. यंगस्टर्सच्या प्रेमाच्या या कहाणीद्वारे अहान अन् अनीत पड्डा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ‘सैयारा’ हा चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित या चित्रपटात भव्यता दिसून येत आहे. मोहित सूरी याच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटाची कहाणी नवी नसली तरीही नव्या जोडीने या जुन्या कहाणीत रंग भरण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाची ही कहाणी संगीताशी निगडित कलाकारांची आहे. कलेला मान मिळत नसल्याने संतापलेल्या कलाकाराची भूमिका अहानने साकारली आहे. तर या कलाकारावर प्रेम करणाऱ्या युवतीची भूमिका अनीत पड्डाने साकारली आहे. या प्रेमकहाणीला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार की नाही हे येणारा काळच ठरविणार आहे.