‘हेड्स ऑफ स्टेट’चा ट्रेलर सादर
प्रियांका चोप्रा, जॉन सीना मुख्य भूमिकेत
प्रियांका चोप्राचा बहुप्रतीक्षित हॉलिवूडपट ‘हेड्स ऑफ स्टेट’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या चित्रपटात ती अॅक्शन अवतारात दिसून येणार आहे. चित्रपटात हाय-ऑक्टेन स्टंट असून याची झलक ट्रेलरमध्ये दिसून येते. प्रियांकाची व्यक्तिरेखा एक मिशनवर आहे. ती अमेरिकेचे अध्यक्ष विल डेरिंगर आणि युकेचे पंतप्रधान सॅम क्लार्क यांना वाचविण्याच्या मिशनवर असल्याचे दाखविण्यात आले आहे. हेड्स ऑफ स्टेटमध्ये जॉन सीना हा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भूमिकेत आहे. तर युकेच्या पंतप्रधानांची भूमिका इद्रिस एल्बाने साकारली आहे. विमान दुर्घटनेनंतर विल डेरिंगर आणि सॅम क्लार्क एक अज्ञात ठिकाणी पोहोचतात, तेथे त्यांना कुठल्याही सैन्याशिवाय स्वत:चे स्वत:चे रक्षण करायचे असते. आपण एका शक्तिशाली आणि क्रूर विदेशी शत्रूच्या निशाण्यावर असल्याचे कळल्यावर दोघेही परस्परांशी हातमिळवणी करतात.
प्रियांका एमआय6 एजंटच्या भूमिकेत
विल आणि सॅम स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत असताना एमआय6 एजंट नोएल बिसेटची एंट्री होते, ती त्यांच्या जीवनात आशेचा किरण ठरते. नोएल बिसेटची भूमिका प्रियांकाने साकारली आहे. हेड्स ऑफ स्टेटमध्ये प्रियांका, जॉन सीना, इद्रिस एल्बासोबत कार्ला गुगिनो, जॅक क्वेड, स्टीफन रुट, सारा नाइल्स, रिचर्ड कोयल आणि पॅ•ाr कॉन्सिडिन देखील आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर 2 जुलै रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.